Latest Marathi News | ‘भोसरी’ प्रकरणी तथ्य नसतांनाही चौकशी करून छळण्याचा प्रयत्न : एकनाथ खडसे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Khadse

‘भोसरी’ प्रकरणी तथ्य नसतांनाही चौकशी करून छळण्याचा प्रयत्न : एकनाथ खडसे

जळगाव : भोसरी जमीन खरेदी प्रकरणी या अगोदर झालेल्या चौकशीत कोणतेही तथ्य आढळले नाही, आता पुन्हा लाचलुचपत प्रतिबंध विभागातर्फे त्याची चौकशी करण्यात येत आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत आपण त्यांना विजयी होण्यात अडचण ठरणार असल्याने आपला छळ करून मानसिक संतुलन बिघडविण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर नवीन सरकारने भोसरी जमीन खरेदी प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागातर्फे चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत बोलताना आमदार एकनाथ खडसे म्हणाले, या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी करून काहीही तथ्य नसल्याचा अहवाल दिला असून या प्रकरणाची एफआयआर रद्द करावी, असा क्लोजर रिपोर्ट पुणे सत्र न्यायालयात दीड वर्षापूर्वी दिला. नाशिक लाचलुचपत प्रतिबंध विभागाने चौकशी करून त्यात या प्रकरणी कोणतेही तथ्य नाही, असा अहवाल दिला. माजी न्यायमूर्ती झोटिंग यांच्या समितीने केलेल्या चौकशीत माझा या प्रकरणात काहीही संबंध नाही, असा अहवाल दिल्याचे मला समजले. आता ईडीच्या माध्यमातून ही चौकशी सुरू आहे. एकंदरीत वारंवार नाथाभाऊंच्या मागे चौकशी लावून मानसिक छळ करण्याचा प्रकार सुरू आहे. विरोधकांना माहिती आहे, की या विभागात खडसेच राजकीयदृष्ट्या बलाढ्य आहे, निवडणुकीतही अडचण ठरणार आहे. नाथाभाऊ बाजूला गेला की यांना रान मोकळे मिळणार आहे. आता जनता हे सर्व पाहत आहे.

राज्यपालांकडून मराठी माणसाचा अपमान

राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांनी मुंबईबाबत केलेले वादग्रस्त वक्तव्य हे मराठी माणसाचा अपमान करणारे आहे, असे मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. याबाबत ते म्हणाले, की हा महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे. विकासात त्याचे योगदान मोठे राहिलेले आहे. या ठिकाणी मराठी माणूस ग्राहक आहे, म्हणून हा व्यापार चालतो आहे. त्यामुळे एका दृष्टीने पाहिले तर मराठी माणसाचा हा अवमान आहे.