Jalgaon Crime News: किनगावला वृद्धाची गळा चिरून हत्या; कारण गुलदस्त्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Crime News

Jalgaon Crime News: किनगावला वृद्धाची गळा चिरून हत्या; कारण गुलदस्त्यात

यावल : तालुक्यातील किनगाव येथील वयोवृद्ध वाहनचालकाचा अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने निर्घृण खून केल्याची घटना गुरुवारी (ता. २४) समोर आली. किनगाव-चुंचाळे रस्त्यावरील ढोल्या मोह नदीच्या पुलाखाली मृतदेह आढळून आला असून, भीमराव शंकर सोनवणे (वय ६०) असे खून झालेल्या मृताचे नाव आहे. या घटनेने किनगाव- चुंचाळे परिसरात खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथील भीमराव शंकर सोनवणे यांचा गुरुवारी रात्रीच्या सुमारास कुणीतरी अज्ञात व्यक्तीने धारधार शस्त्राने गळा चिरून, दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली आहे. चुंचाळे रस्त्यावरील किनगाव शिवारातील ढोल्या मोह नदीच्या पुलाखाली मृतदेह आढळून आल्याने किनगाव व चुंचाळे परिसरात खळबळ उडाली आहे.

घटनेचे वृत्त कळताच फैजपूर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रदीप बोरूडे यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले व पंचनामा केला आहे. घटनास्थळी श्‍वान पथकास पाचारण करण्यात आले. मात्र श्‍वान माग काढू शकला नाही.

मागील चार ते पाच महिन्याच्या कालावधीत अशा प्रकारे खून झाल्याची तालुक्यातील ही चौथी घटना आहे. या संदर्भात यावल पोलिस ठाण्यात खून झालेल्या व्यक्तीचा मुलगा विनोद भीमराव सोनवणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा खून कुणी व कशासाठी केला? हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

टॅग्स :JalgaonCrime Newsdeath