Jalgaon Crime News : विवाहितेच्या छळप्रकरणी मेहुणबारे येथे गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

torture

Jalgaon Crime News : विवाहितेच्या छळप्रकरणी मेहुणबारे येथे गुन्हा दाखल

मेहुणबारे (जि. जळगाव) : पती नेहमीच दारू पिऊन छळ करायचा, तरीही मुलांसाठी तिने सहन केले. त्यातच आता घर बांधण्यासाठी माहेरून पाच लाख रूपये आण म्हणून आणखीच छळ वाढला. (case registered in case of harassment of married woman jalgaon crime news)

परंतु वडिलांची गरिबीची परिस्थिती असल्याने एवढे पैसे आणू शकत नाही, असे सांगताच सासरच्यांनी माहेरी टाकून घातले. सर्वकाही संपल्यावर हताश विवाहितेने पोलिस ठाण्याची वाट धरली. या प्रकरणी पती, सासू, आत्येसासू व सासरे अशा चौघांविरोधात मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्राम्हणशेवगे (ता. चाळीसगाव) येथील माहेर असलेल्या २७ वर्षीय महिलेचा विक्रांत अनिल पाटील (रा. राखुंडे नगर, चाळीसगाव) याच्याशी ११ फेब्रुवारी २०१६ मध्ये विवाह झाला. सुरवातीला सहा महिने पती विवाहितेशी चांगला वागला. नंतर दारू पिऊन छळ करायचे. मुले झाल्यावर आतातरी पती सुधारतील म्हणून विवाहितेने जाच सहन केला.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

छळ सहन करून संसार सुरूच होता. विवाहिता गरोदर असतानाही मारहाण केली. पतीच्या कार्यालयात जावून विवाहितेने साहेबांकडे तक्रार केल्याचा राग आला असता पती व सासूने रात्री घराबाहेर काढले. पीडिताने एमआयडीसी पोलिसात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयामार्फत विवाहिता सासरी नांदण्यास गेली.

त्यानंतर पतीने मला नवीन घर घ्यायचे आहे. तुझ्या माहेरून पाच लाख रूपये घेऊन ये, असे सांगितले. मात्र माहेरची परिस्थिती गरिबीची असल्याने एवढे पैसे आणू शकत नाही, असे सांगितले असता माहेरी पाठवून दिले. पतीसह सासूने वेळोवेळी मारहाण करून माहेरी टाकून घातल्याने विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून पती विक्रांत अनिल पाटील, सासू निर्मला अनिल पाटील, मंगला धर्मा पाटील, धर्मा पाटील यांच्याविरोधात मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.