GRADUATE ELECTION : ‘पदवीधर’ साठी मतदारांचा मतदानासाठी उत्साह; जिल्ह्यात 51 टक्के मतदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon: R. R. The crowd at the polling station in the school

GRADUATE ELECTION : ‘पदवीधर’ साठी मतदारांचा मतदानासाठी उत्साह; जिल्ह्यात 51 टक्के मतदान

जळगाव : नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघासाठी सोमवारी (ता. ३०) सकाळी आठपासून शांततेत मतदान सुरू झाले. नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी मतदार आपला हक्क उत्साहात बजावत असल्याचे चित्र दिसून आले. सकाळी कमी गर्दी असली, तरी दुपारी एकनंतर मतदानासाठी येणाऱ्यांची संख्या वाढली होती. दुपारी चारपर्यंत ५१ टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले.

सकाळपासून बहुतांश जिल्ह्यात मतदारांचा उत्साह दिसून आला. जळगाव जिल्ह्यात सकाळच्या टप्प्यात ३५ हजार ५८ मतदारांपैकी २,२६७ (६.४७) मतदारांनी मतदान केले होते. (Enthusiasm of voters to vote for Graduate Fifty One percent voting in Jalgaon district Now curious about Result Jalgaon News)

अपक्ष उमेदवार डॉ. सत्यजित तांबे यांनी नगर येथे, महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांनी धुळे शहरातील महापालिका शाळा क्रमांक आठ येथे मतदानाचा हक्क बजावला.

शहरात आर. आर. विद्यालयात एकूण सहा मतदान केंद्रे होती. सकाळपासूनच उमेदवारांचे समर्थक मतदान केंद्राबाहेर मतदारांना मतदार यादीतील नावे, बूथ क्रमांक शोधून देत होते. आर. आर. शाळेच्या बाजूला दोन्ही बाजूंनी उमेदवारांच्या समर्थकांनी तंबू लावून मतदारयाद्या ठेवल्या होत्या. संबंधित पक्षाचे नेते, पदाधिकारी, त्याठिकाणी उपस्थित होते.

मतदार आले की नाही, त्यांना फोन करून ‘मतदानाला या’, असे फोन पदाधिकारी व कार्यकर्ते करताना दिसत होते. दुपारी तीननंतर मतदानासाठी रांगा लागल्याचे चित्र मतदान केंद्रावर होते.

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

जळगाव शहरात उत्साह

जळगाव शहरातील आर. आर. विद्यालयाच्या प्रांगणातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये मतदान केंद्र व बूथ होते. सकाळी आठला मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. सकाळी दहा ते दुपारी एकदरम्यान केंद्रावर चांगलीच गर्दी दिसून आली. माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, त्यांच्या पत्नी डॉ. वर्षा व कन्या डॉ. केतकी यांनी या केंद्रावर मतदान केले.

जिल्ह्यातील मतदान

एकूण मतदान : ३५,०५८

झालेले मतदान : १८,०३३

टक्केवारी : ५१.४४ टक्के