एरंडोल पालिकेस ‘थ्री स्टार’ मानांकन | Jalgaon | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जळगाव : एरंडोल पालिकेस ‘थ्री स्टार’ मानांकन

जळगाव : एरंडोल पालिकेस ‘थ्री स्टार’ मानांकन

एरंडोल : केंद्र शासनाच्यावतीने मागील वर्षापासून सुरू केलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण व कचरामुक्त शहर या अभियानात एरंडोल नगरपालिकेस ‘थ्री स्टार’ मानांकन प्राप्त झाले. नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत नगरविकासमंत्री, आवास व शहरी कार्य मंत्रालय, निर्माण भवनाच्या सचिव दुर्गाशंकर मिश्रा, सहसचिव रूपा मिश्रा यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

मुख्याधिकारी विकास नवाळे, नाशिकचे जिल्हा प्रशासन अधिकारी तथा पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी किरण देशमुख, कार्यालय अधीक्षक हितेश जोगी, आरोग्य निरीक्षक अनिल महाजन, मुकादम आनंद दाभाडे यांनी दिल्ली येथे पुरस्कार स्वीकारला. नगराध्यक्ष रमेश परदेशी, तत्कालीन मुख्याधिकारी किरण देशमुख, मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांनी कचरामुक्त शहर निर्माण करण्यासाठी योग्य ते नियोजन केल्यामुळेच पालिकेस राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाला आहे. नागरिकांच्या सहकार्यामुळे स्वच्छ शहर व कचरामुक्त ही संकल्पना प्रत्यक्ष कृतीत यशस्वी झाल्याचे नगराध्यक्ष रमेश परदेशी आणि मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी सांगितले.

हेही वाचा: नाशिक : महाराजा सयाजीरावांच्या ४० ग्रंथांचे होणार प्रकाशन

स्वच्छ सर्वेक्षणाअंतर्गत देशातील सर्व नगरपालिका, महानगरपालिकांच्या शहरातील स्वच्छतेची केंद्रीय पथकाने पाहणी करून तपासणी केली होती. यासाठी देशात ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साउथ असे चार झोन तयार करण्यात आले होते. वेस्ट झोनमध्ये महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान आणि गोवा या राज्यांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये लोकसंख्येनुसार तीन ग्रुप तयार करण्यात आले होते. यामध्ये पन्नास हजार ते एक लाख लोकसंख्या असणाऱ्या शहरांचा एक ग्रुप, २५ हजार ते ५० हजार लोकसंख्या असणाऱ्या शहरांचा एक ग्रुप आणि २५ हजारपेक्षा कमी असणाऱ्या शहरांचा एक ग्रुप तयार करण्यात आला होता. एरंडोल नगरपालिका २५ हजार ते ५० हजार लोकसंख्या असणाऱ्या शहरांच्या ग्रुपमध्ये असून वेस्ट झोनमधून एरंडोल पालिकेने २८ वा क्रमांक प्राप्त केला आहे. याबाबत नगराध्यक्ष रमेश परदेशी आणि मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी नियोजन

एरंडोल पालिकेने स्वच्छ सर्वेक्षण २०१९च्या वेस्ट झोनमध्ये २३७ वा क्रमांक प्राप्त केला होता. त्यानंतर पालिकेने योग्य नियोजन करून स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये मोठी झेप घेत २३७ व्या क्रमांकावरून थेट ३९ व्या स्थानावर झेप मारली होती. तर स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये पालिकेने हागणदारीमुक्त शहर व कचरामुक्त शहरामध्ये मानांकन प्राप्त करून २८ वा क्रमांक प्राप्त केला. स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये २५ हजार ते ५० हजार लोकसंख्या असणाऱ्या शहरांच्या ग्रुपमध्ये वेस्ट झोनमध्ये ३०४ पालिकांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये एरंडोल पालिकेने पहिल्या पन्नासमध्ये येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. याकामी विभागस्तर आणि जिल्हास्तरावर एरंडोल पालिकेस पहिल्या दहा क्रमांकामध्ये स्थान मिळण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या सर्वेक्षणात पालिकेने पाच घंटागाडीद्वारे शहरात घरोघरी जाऊन ओला आणि सुका कचरा, घरगुती घातक कचरा व प्लॅस्टिक कचरा जागेवरच वर्गीकरण करून संकलित केला आहे. एरंडोल शहर प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठीदेखील नियोजन केले असून कॅरी बॅगचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. हागणदारीमुक्त अभियानांतर्गत एरंडोल पालिकेस odf++ ही गुणवत्ता दुसऱ्यांदा प्राप्त झाली आहे.

हरित खताचा वापर करावा

पालिकेतर्फे ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून सेंद्रिय खत निर्मिती सुरू केली असून शासनाचा हरित ब्रॅण्ड दर्जा प्राप्त केला आहे. सदर खताची वेळोवेळी शासकीय प्रयोगशाळेतून तपासणी करण्यात येत असते.नगराध्यक्ष रमेश परदेशी यांनी प्रायोगिक तत्त्वावर स्वत: ५०० हरित खतांच्या थैल्या खरेदी केल्या आहेत, नागरिकांनी पालिकेच्या हरित खताचा वापर करावा, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे. नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे तसेच पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेबाबत केलेल्या योग्य नियोजनामुळेच पालिकेला थ्री स्टार मानांकन प्राप्त झाले असून स्वच्छ सर्वेक्षण २०२२ मध्ये नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष रमेश परदेशी, मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी केले आहे.

loading image
go to top