Jalgaon News : मनपा अजब तुझा कारभार! तयार रस्त्यावर चेंबरसाठी खोदकाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chamber work in progress on the road between Pandey Dairy Chowk and Neri Naka.

Jalgaon News : मनपा अजब तुझा कारभार! तयार रस्त्यावर चेंबरसाठी खोदकाम

जळगाव : महापालिकेच्या कामांमधील घोळात घोळ मिटायला तयार नाही. भुयारी गटार योजनेचे पहिल्या टप्प्यातील काम वर्षभरापूर्वी पूर्ण झाले असले, तरी त्यातील सदोष तांत्रिक कामाच्या मर्यादा उघड होत आहेत.

पांडे डेअरी ते नेरी नाका चौकादरम्यान रस्त्याच्या खाली गेलेल्या चेंबरला लेव्हल करण्यासाठी तयार डांबरी रस्त्यावर चेंबर पुन्हा खोदणे सुरू झाले आहे. (Excavation for chamber on prepared street by jalgaon municipality News)

जळगाव महापालिकेतर्फे होत असलेल्या कामांमध्ये नियोजनाचा अभाव आणि प्रचंड गोंधळाची स्थिती आहे. सहा ते सात वर्षांपासून अमृत योजनेंतर्गत भुयारी गटार व पाणीपुरवठा योजनेच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी संपूर्ण शहरातील रस्त्यांची चाळण करण्यात आली.

अजूनही पाणीपुरवठा योजनेचे काम झालेले नाही. या अपूर्ण कामांमुळे रस्त्यांच्या कामांमध्ये अडथळे आलेत. कसेबसे रस्त्यांची कामे सुरू झाली. मात्र, रस्ते तयार झाल्यावर महापालिकेला अचानक काही कामांचा साक्षात्कार होऊ लागला आणि तयार रस्त्यांवर जेसीबी फिरवणे सुरू झाले आहे.

भुयारी गटार कामाच्या मर्यादा झाल्या उघड

एकीकडे अनेक वर्षांनंतर रस्त्यांची कामे सुरू झाली असताना, काही ना काही कारण काढून तयार रस्त्यांवर महापालिकेकडून खोदकाम केले जात असल्याचे गंभीर प्रकार समोर येत आहेत. आता भुयारी गटार कामाच्या मर्यादा उघड होत आहेत.

वर्षभरापूर्वी पहिल्या टप्प्यातील भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण झाल्याचा दावा केला गेला. अमदाबादच्या एल. सी. इन्फ्रास्ट्रक्चरल यांना कामाचे कंत्राट दिले होते. प्रत्यक्षात काम सुरू झाल्यापासून या कामाबद्दल तक्रारी होत गेल्या.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

मात्र, त्याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले. आता याच कामाच्या मर्यादा समोर येत आहेत. या अंतर्गत स्वातंत्र्य चौक- पांडे डेअरी चौक ते नेरी नाका या टप्प्यात भुयारी गटाराच्या कामात काही चेंबर करण्यात आले.

प्रत्यक्ष रस्त्याच्या लेव्हलपेक्षा ते चेंबर खाली होते. इतर काही रस्त्यांवर हेच चेंबर रस्त्याच्या लेव्हलपेक्षा उंच आहेत. तांत्रिकदृष्ट्या सदोष असलेल्या या कामाबद्दल तक्रारी अजूनही होत आहेत.

रस्ता झाला, आता पुन्हा खोदकाम

काम पूर्ण झाल्यानंतर या रस्त्याचे कंत्राट अन्य कंत्राटदाराने घेतले. मागे लागून त्याच्याकडून रस्त्याचे काम पूर्णही करून घेण्यात आले. मात्र, नव्याने तयार झालेल्या रस्त्याच्या लेव्हलपेक्षा चेंबर खाली गेले. त्यामुळे स्वातंत्र्य चौक ते थेट नेरी नाक्यापर्यंत या चेंबरचे खड्डे जाणवतात.

आता हा प्रकार उशिरा का होईना, महापालिकेच्या लक्षात आले. त्यामुळे आता हे चेंबर रस्त्याच्या लेव्हलपर्यंत उंच करण्यासाठी हा तयार डांबरी रस्ता पुन्हा खोदला जात आहे. अर्थात, चेंबरच्या जागेएवढेच खोदण्यात येत असले, तरी त्यामुळे रस्त्याचे स्ट्रक्चर खराब होऊन पूर्ण रस्ताच खराब होण्याची शक्यता व्यक्त होतेय.