
Nandurbar News : कुढावदला कोरड्या नाल्यात आढळला बिबट्याचा मृतदेह; शहादा येथे अंत्यसंस्कार
शहादा (जि. नंदुरबार) : शहादा वनक्षेत्रातील कुढावद (ता. शहादा) शिवारात रस्त्याला लागूनच असलेल्या एका कोरड्या नाल्यात एक ते सव्वा वर्ष वय असलेल्या मादी जातीच्या बिबट्याचा मृतदेह आढळून आला.
याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविल्यानंतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तत्काळ पाहणी व पंचनामा करुन शहादा वनविभागाच्या कार्यालय परिसरात मृत बिबटचे शवविच्छेदन करुन अंत्यसंस्कार करण्यात आले. (Dead body of leopard found in dry stream in Kudhavad Cremation at Shahada Nandurbar News)
सध्या रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरु असून, शेतशिवरात मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. शनिवारी (ता. ४) सकाळी पावणे अकराला नेहमीप्रमाणे शेतात काम करत असलेल्या शेतमजुराला बिबट्या मृत अवस्थेत पडलेला दिसून आला.
त्यानंतर त्यांनी गावाकडे धाव घेत कुढावद येथील पोलीस पाटील भरत पाटील यांना सदरची घटना सांगितली. श्री. पाटील यांनी तत्काळ शहादा येथील वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली. माहिती समजताच दरा वनविभागाचे अधिकारी संजय पाटील यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
पंचनामा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले. यावेळी कुढावद व औरंगपूर गावातील ग्रामस्थांनी, तसेच शेतकऱ्यांनी मृत बिबट्याला बघण्यासाठी गर्दी केली होती. वनविभागातील कर्मचाऱ्यांनी परिसराचीदेखील पाहणी केली. मात्र कोणत्याही प्रकारच्या इतर प्राण्यांच्या खुणा आढळून आल्या नाहीत.
हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...
दरम्यान, मृत बिबट मादी असून, तिचे वय अंदाजे एक ते सव्वा वर्ष असावे. प्रथमदर्शनी मृत्यू हा वय जास्त आणि शरीरात रक्त कमी असल्याने, भुकेमुळे झाल्याचा अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला असून, शव विच्छेदन अहवाल आल्यावर नेमके कारण समजू शकेल. शव विच्छेदनानंतर मृत बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सहाय्यक वनसंरक्षक संजय साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली शहाद्याचे वनक्षेत्रपाल आशुतोष मेढे, दरा विभागाचे वनपाल एस. एम. पाटील, वनरक्षक एस. जी. मुकाडे, वाहनचालक नईम मिर्झा, मानद वन्यजीव रक्षक सागर निकुंभे यांनी ही कार्यवाही केली. वनक्षेत्रपाल मेढे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल पाटील तपास करत आहेत.
"मयत मादी जातीचा बिबट्याचे सर्व अवयव सुस्थितीत असून, कुठल्याही प्रकारच्या जखमा त्याच्या अंगावर नाहीत. वय अंदाजे एक ते सव्वा वर्ष असावे. घटनेची माहिती मिळताच तत्काळ टीमसह पोहचलो. घटनेचा व जागेचा पंचनामा केला. शवविच्छेदन अहवालानंतरच नेमका मृत्यू कशामुळे झाला ते कळेल." -एस. एम. पाटील, वनपाल, दरा.