सर्वपक्षीयांच्या ‘शेतकरी विकास’चा धुळे-नंदूरबार जिल्हा बँकेवर झेंडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धुळे-नंदुरबार जिल्हा बँके
सर्वपक्षीयांच्या ‘शेतकरी विकास’चा धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेवर झेंडा

‘शेतकरी विकास’चा | धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेवर झेंडा

धुळे : धुळे व नंदूरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत दोन्ही जिल्ह्यांतील दिग्गज राजकीय नेत्यांनी वेगवेगळ्या चुली मांडल्याने चुरस व उत्सुकता निर्माण झाली होती. या चुरशीच्या निवडणुकीचा निकाल सोमवारी (ता. २२) जाहीर झाला. यात माजी मंत्री तथा आमदार अमरिश पटेल, जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे व धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वातील ‘सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनेल’ने पुन्हा एकदा बाजी मारली.

दुसरीकडे, शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखालील ‘किसान संघर्ष पॅनेल’ला एका बिनविरोधसह चार जागांवर समाधान मानावे लागले. दरम्यान, या निवडणुकीत खासदार डॉ. सुभाष भामरे यांचे बंधू सुरेश रामराव पाटील, तसेच जिल्हा परिषद सदस्य पोपटराव सोनवणे यांचे पुत्र अक्षय सोनवणे यांना पराभवाचा सामना करावा लागला.

हेही वाचा: कोकणात ग्रामपंचायत निवडणूकीचा धुरळा उडणार : आचारसंहिता लागू

निवडणूक प्रक्रियेत १७ पैकी सात जागा या पूर्वीच बिनविरोध झाल्याने उर्वरित दहा जागांच्या निकालाची उत्सुकता होती. सोमवारी येथील वाडीभोकर रोडवरील पारस मंगल कार्यालयात मतमोजणी झाली. सकाळी अकरापर्यंत सर्व निकाल जाहीर झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक अभिजित देशपांडे यांनी, तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निरज चौधरी यांनी काम पाहिले.

सर्वपक्षीयचे विजयी उमेदवार असे
राजवर्धन रघुजीराव कदमबांडे (१३१ मते), हर्षवर्धन दहिते (५२), महंत दर्यावगीर दौलतगीर (६९४), शिलाबाई विजय पाटील (७५८), सीमा तुषार रंधे (७४५), राजेंद्र श्‍यामराव देसले (६२), अमरसिंग हुरजी गावित (१३), दीपक पुरुषोत्तम पाटील (बिनविरोध), भरत बबनराव माळी (बिनविरोध), शिरीषकुमार सुरूपसिंग नाईक (बिनविरोध), प्रभाकर तुकाराम चव्हाण (बिनविरोध), श्‍यामकांत रघुनाथ सनेर (बिनविरोध), भगवान विनायक पाटील (बिनविरोध).

किसान संघर्षचे विजयी उमेदवार
चंद्रकांत बटेसिंग रघुवंशी (५९), प्रा. शरद माधवराव पाटील (१२०), संदीप मोहन वळवी (१०), आमशा फुलजी पाडवी (बिनविरोध).

सुरेश पाटील, अक्षय पाटील यांचा पराभव
या निवडणुकीत इतर शेती संस्था मतदारसंघातून प्रा. शरद पाटील (१२०) यांनी माजी मंत्री तथा विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांचे बंधू सुरेश रामराव पाटील (७७) यांचा पराभव केला. तर प्राथमिक कृषी पतसंस्था, विका सेवा सहकारी संस्था साक्री तालुका या मतदारसंघातून हर्षवर्धन दहिते (५२) यांनी अक्षय पोपटराव सोनवणे (२५) यांचा पराभव केला.

loading image
go to top