esakal | पाच महिने उलटले तरी शेकडो केळी उत्पादक शेतकरी वंचित

बोलून बातमी शोधा

पाच महिने उलटले तरी शेकडो केळी उत्पादक शेतकरी वंचित}

रावेर तालुक्यातील खिर्डी महसूल मंडळातील सर्वच विमा धारक शेतकरी या भरपाई पासून वंचित आहेत.

पाच महिने उलटले तरी शेकडो केळी उत्पादक शेतकरी वंचित
sakal_logo
By
दिलीप वैद्य

 रावेर ः  2019-20 या वर्षांसाठी पंतप्रधान फळ पीक विमा योजनेतील वादळाने केळीचे नुकसान झालेल्या विमाधारक शेतकऱ्यांना तब्बल 5 महिन्यानंतरही विमा कंपनीने नुकसान भरपाई दिलेली नाही. याबाबत शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून आता कंपनीने व्याजासह नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, 2019-2020 या वर्षासाठी जळगाव जिल्ह्यातील 40 हजार पेक्षा जास्त केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केळीचा पीक विमा काढला होता. मात्र त्यात वादळाने केळीचे नुकसान झालेल्या रावेर, जळगाव,यावल आणि चोपडा तालुक्यातील शेकडो केळी उत्पादक शेतकऱ्यांना विमा कंपनीने अद्यापही नुकसान भरपाई दिलेली नाही. ही नुकसान भरपाई 15 सप्टेंबरपर्यंत देणे अपेक्षित असते मात्र त्यानंतर 5 महिने उलटून गेल्यानंतरही कंपनीकडून भरपाई देण्याबाबत टोलवाटोलवी सुरू आहे.

विमा आठ-दहा दिवसानंतर 

राज्यशासनाचा विम्याचा हप्ता उशिरा मिळाल्याचे कारण कंपनीने सुरुवातीला सांगितले. मात्र राज्य शासनाचा विमाहप्ता मिळून आता सुमारे दीड महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेल्यानंतरही भरपाई अद्याप मिळालेली नाही. रावेर तालुक्यातील खिर्डी महसूल मंडळातील सर्वच विमा धारक शेतकरी या भरपाई पासून वंचित आहेत तर अन्य भागातही तांत्रिक अडचणीमुळे असंख्य शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.एकट्या रावेर तालुक्यात प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची संख्या एक हजारापेक्षा जास्त आहे. याबाबत विमा कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधला असता 'अजून किमान आठ-दहा दिवसानंतर ही भरपाई मिळू शकेल' अशी माहिती देण्यात आली.


 
विम्याचा हप्ता एक दिवसही उशिरा भरला तर विमा कंपनी दंड अगर व्याज आकारते. आता या पाच महिन्यांच्या भरपाईवर देखील विमा कंपनीने आता व्याजासह भरपाई द्यावी अन्यथा ग्राहक न्यायालयात जाऊ 

-अशोक गणपत वाणी, केळी उत्पादक शेतकरी, रावेर. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे