दातृत्वाला सलाम! शेतकऱ्यांने स्वतःची जमीन अभ्यासिकेसाठी केली दान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

library

दातृत्वाला सलाम! शेतकऱ्यांने स्वतःची जमीन अभ्यासिकेसाठी केली दान

अमळनेर : ‘देणाऱ्याने देत जावे... घेणाऱ्याने घेत जावे... घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे’ या काव्यपंक्तीचा प्रत्यय देणारे अनोखे दातृत्व बोहरा (ता. अमळनेर) येथील आसाराम सोमा धनगर (रत्नपारखी) या शेतकऱ्याच्या रुपाने समोर आले आहे. त्यांनी आपली स्वतःच्या मालकीची जमीन अभ्यासिका, देवमढीसाठी दान दिली आहे. विशेष म्हणजे, नियोजित देवमढी व अभ्यासिकेच्या बांधकामाला आजपासून सुरवात झाली असून, भविष्यात गरजू, गोरगरीब, हुशार विद्यार्थ्यांना अभ्यासिकेचा लाभ मिळणार आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे धनगर समाजबांधवांनी या कार्यासाठी आर्थिक मदत करण्याचा संकल्पही केला आहे.

हेही वाचा: Live-in-Relationship : 'लिव्ह इन रिलेशनशीप'मधील महिलांना कायद्याची मदत मिळते का ?

‘ज्या मातीत जन्मलो ती माती आणि ज्या माणसांमध्ये वाढलो ती नाती कधी विसरायची नसतात’ हे ब्रीदवाक्य उराशी बाळगत श्री. धनगर यांनी नेहमीच आपल्या मातीशी असणारी नाळ घट्ट बांधून ठेवली आहे. श्री. धनगर याना स्वतःचे शिक्षण दहावीपर्यंत घेता आले. अन् पुढील शिक्षण घेता आले नाही, ही खंत दूर करण्यासाठी आपल्या तिन्ही मुलांना उच्चशिक्षण देण्याचा संकल्प केला आणि तो पूर्णही केला. सद्य:स्थितीत मोठे चिरंजीव विजय रत्नपारखी हे शिक्षित असले तरी काळ्या आईची सेवा करीत आहेत. दुसरे चिरंजीव वसंत रत्नपारखी हे भुसावळ येथील म्युनिसिपल हायस्कूलमध्ये शिक्षक तर सून वैशाली सूर्यवंशी या भुसावळ येथेच शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. लहान चिरंजीव प्रा. मनोज रत्नपारखी हे पारोळा येथील किसान महाविद्यालयात कार्यरत असून, सुनबाई प्रा. सुचित्रा रत्नपारखी या अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात कार्यरत आहेत. आपले कुटुंब शिक्षणामुळे पुढे गेले हीच बाब लक्षात घेऊन आपल्या गावातील गोरगरीब विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून उच्च पदावर जावे, यासाठी अभ्यासिकेची नितांत आवश्यकता होती. गावाच्या बसस्थानकाजवळ असलेल्या गजबजलेल्या ठिकाणी त्यांनी आपल्या स्वतःच्या मालकीची जमीन अभ्यासिका व देवमढी अर्थात कुलदैवत असलेल्या भिला बहिरम मढीला दान दिली आहे. ही दातृत्वाची कृती अनेकांना प्रेरणादायी ठरणार आहे. या दातृत्वामुळे समाजात सकारात्मकता पसरत असून, अनेक धनगर समाजबांधवांचे मदतीचे हात पुढे येत आहे.

हेही वाचा: Education Day : मौलाना आझाद यांच्या वाढदिवशी शिक्षण दिवस का साजरा केला जातो ?

..यांनी केला दातृत्वाचा सन्मान

आयकर आयुक्त संदीपकुमार साळुंखे, नागपूर विकास प्राधिकरण उपसंचालक कपिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात नुकतीच ‘करिअर संवाद वारी- आपल्या दारी’ हा उपक्रम घेण्यात आला. यातून प्रेरणा घेत प्रगतिशील शेतकरी तथा साने गुरुजी उपसा सिंचनचे संचालक आसाराम धनगर यांनी आपली जमीन दान दिली. या पार्श्वभूमीवर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक तथा धनगर समाज कर्मचारी संघटना माजी जिल्हाध्यक्ष डी. ए. धनगर, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक उमेश काटे, तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष निरंजन पेंढारे यांनी सन्मानित केली. या वेळी प्रा. मनोज रत्नपारखी, उत्तम रत्नपारखी, पोपट रत्नपारखी, रतन रत्नपारखी, सोपान रत्नपारखी, राजेंद्र रत्नपारखी, अशोक बोरसे, निखिल बोरसे, शेखर बोरसे, अशोक पाचपोळ, राजू रत्नपारखी, राजू कोळी, राहुल रत्नपारखी, हिरामण लांडगे, केतन रत्नपारखी, शुभम रत्नपारखी, शुभम रत्नपारखी, शेखर रत्नपारखी, कैलास रत्नपारखी आदी उपस्थित होते.

टॅग्स :JalgaonFarmer