
Jalgaon : पोटच्या अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या नराधम पित्यास अटक
पाचोरा (जि. जळगाव) : तालुक्यातील एका मोठ्या गावात मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील पंधरावर्षीय स्वतःच्या अल्पवयीन मुलीसोबत तीन वर्षांपासून अश्लील चाळे करून तिच्यासह आईला मारण्याची व घरातून हाकलून देण्याची धमकी देणाऱ्या नराधम पित्यास पोलिसांनी अटक केली. या घटनेमुळे सारा तालुका संतप्त झाला असून, अशा नराधमास कठोर शिक्षेची मागणी समाजमनातून केली जात आहे. (father arrested for molesting his own minor girl Jalgaon Crime Update News)
पीडित मुलीची आई मोलमजुरी आणि शेळ्या चारण्याचे काम करते. वडीलही मिळेल ते काम करतात. पीडित मुलगी सप्टेंबर २०१९ मध्ये बारा वर्षांची असताना नराधम बापाने घरी कोणी नसताना मोबाईलवरील अश्लील व्हिडिओ तिला दाखविले. ती कपडे बदलत असताना तिच्याशी अश्लील वर्तन केले.
हा प्रकार आईला अथवा इतरांना सांगितला तर तुम्हा दोघांना मारझोड करेन व आईला घरातून हाकलून देईन, अशी धमकी त्याने दिली होती. त्यामुळे पीडित मुलीने पित्याकडून होणारा सारा अत्याचार सहन केला. त्यामुळे नराधमाचा किळसवाणा प्रकार वाढत गेला.
मंगळवारी (ता. १३) पीडितेची आई शेळ्या चारण्यासाठी शेतशिवारात गेली असता नराधमाने पीडितेसोबत किळसवाणे वर्तन करीत अश्लील व्हिडिओ पाहण्यास सांगितले; परंतु पीडित मुलीने नकार दिल्याने त्याने शिवीगाळ करीत तो निघून गेला.
या प्रकाराने घाबरलेली पीडिता घरात रडत बसली होती. पीडितेची आई शेळ्या घेऊन घरी आल्यानंतर तिने आईला स्वतःसोबत बापाने केलेला किळसवाणा प्रकार कथन केला. त्यामुळे पीडितेची आई भयभीत झाली. तिने भाऊ व आईला बरोबर घेत पोलिस ठाणे गाठले अन् पतीने केलेला प्रकार सांगत पाचोरा पोलिसांत तक्रार दिली.
त्याआधारे पोलिसांनी विनयभंग, धमकावणे व पॉक्सोंतर्गत नराधम पित्याविरुद्ध गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. पोलिस उपअधीक्षक भारत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किसन पाटील तपास करीत आहेत.