सातपुडामधील यावल वनक्षेत्रातील जैवविविधता संकटात !

भूषण श्रीखंडे
Saturday, 6 March 2021

यावल अभयारण्य वनक्षेत्र सद्यस्थितीत अतिक्रमण आणि वृक्षतोडी च्या विळख्यात सापडले आहे.

जळगाव ः जळगाव जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगातील यावल वनक्षेत्र हे वनअतिक्रमण बेसुमार वृक्षतोडीमूळे संकटात आली आहे. त्याच सोबत वन विभागाकडे अपूर्ण असलेले मनुष्यबळामूळे वन्यप्राणी संर्वधन संकटात आले आहे. त्यामुळे शासनस्तरावरून यावल वनक्षेत्र वाचविण्यासाठी उपायोजना होणे गरजेचे झाले आहे.

 

वन्यजीव संरक्षण बहुद्देशीय संस्था गेल्या 13 वर्षा पासून जळगाव जिल्ह्यातील सातपुडा संवर्धनासाठी कार्य करीत आहेत. जैवविविधतेने समृद्ध असलेले यावल अभयारण्य वनक्षेत्र सद्यस्थितीत अतिक्रमण आणि वृक्षतोडी च्या विळख्यात सापडले आहे. तोकडे मनुष्यबळ असून देखील वनविभाग करत असलेल्या अथक प्रयत्नातून या भागात वाघ आपले अस्तित्व टिकवून आहे. परंतू गेल्या काही वर्षात अनेक दुर्मिळ वनस्पती, पक्षी, प्राणी, सरीसृप, जलचर, कीटक ,विंचू ,यांच्या महत्वपुर्ण नोंदी घेतल्या आहेत. यात काही प्रजाती जागतिक पातळीवर केवळ पश्चिम घाटात प्रदेशनिष्ठ म्हणून ओळख असलेल्या आहेत. परंतू ही समृद्ध जैवविविधता  तांत्रिक कारणांमुळे संकटात सापडली आहे. 

यावल अभयारण्यात ४ वाघांचे वास्तव्य
यावल अभयारण्य सातपुड्याच्या गाभा क्षेत्रात आजही 3 ते 4 वाघ वास्तव्यास असून बिबट, लांडगे, कोल्हे, तडस, रानकुत्रे, सायाळ, अस्वल, या सारखे हिंस्र प्राण्यांचा अधिवास आहे, त्या दृष्टीने तृणभक्षी प्राण्यांची संख्या खूपच मर्यादित आहे. या उलट जिल्ह्यातील इतर भागात शेतकऱ्यांना तृणभक्षी प्राण्यांचा त्रास मोठ्या प्रमाणात होत आहे नीलगाय, चिंकारा, काळवीट सारखे प्राणी मानवी वस्तीकडे आकर्षित होत आहे. त्यामुळे मानव व वन्यजीव यांच्यात  संघर्ष वाढत असल्याचे चित्र आहे. सदर तृण भक्षी प्राणी गाव शिवारातून स्थानांतरित करून अभयारण्यात सोडल्यास एकाच वेळी दोन्ही प्रश्न सुटू शकतात.

राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडी वाढवणेचे गरजेचे
यावल अभयारण्य संरक्षित ठेवण्यासाठी वनविभाग स्थानिक वनाधिकारी वनकर्मचारी स्टाफ पूर्ण क्षमतेने प्रयत्न करीत आहे, प्रधान उपमुख्य वन संरक्षक वन्यजीव सुनील लिमये, मुख्य वन संरक्षक वन्यजीव अनिल अंजनकर हे वेळोवेळी यावल अभयारण्यात भेट देऊन समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात तांत्रिक अडचणीत चोपडा तालुक्यातील देवझीरी वनक्षेत्रात राज्य राखीव पोलीस दल तैनात आहे. त्या कॅम्प चा कार्यकाळ वाढवण्यात यावा. तसेच अजून एक कॅम्प लंगडा आंबा वनक्षेत्रातील वाकी परिसरात अतिरिक्त किमान पुढील 10 वर्षासाठी कार्यरत करावा. 

वनविभागाचे स्टॉप वाढविणे
यावल अभयारण्याचे विस्तृत वनक्षेत्र असून एका बाजूला मध्यप्रदेश ची सीमा आहे त्या भागातून होणारे अतिक्रमण, वनकर्मचाऱ्यावंरील शशस्र हल्ले, वृक्षतोड, आणि वणवे लावण्याच्या च्या घटना आणि वरील सर्व प्रकार रोखण्यासाठी कार्यरत असलेला निशस्त्र वनकर्मचारी स्टाफ बघता यात मोठी उणीव दिसून येते मनुष्यबळ कमी असल्याने  अभयारण्याचे संरक्षण मर्यादित होत आहे . अभयारण्यात किमान 60 लोकांचा प्रशिक्षित आणि कार्यक्षम तरुण स्टाफ अपेक्षित असताना केवळ 16 वनकर्मचारी कार्यरत आहेत सदर संख्या वाढवण्यात यावी. तसेच 2 रेंज ऑफिस आवश्यकता देखील आहे. 

वनवा नियंत्रणासाठी निधीची आवश्‍यकता
दुर्गम भागातील वणवा नियंत्रण करताना अत्याधुनिक साहित्य अत्यावश्यक आहे तसे साहित्य व प्रशिक्षण वनविभागास उपलब्ध नाही. या साठी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत विशेष निधीची तरतूद केली जावी.

मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन
जागतिक वन्यजीव दिनाच्या पार्श्वभूमीवर संस्थे तर्फे बाळकृष्ण देवरे यांनी परत एकदा मुख्यमंत्री कार्यालयास आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना इमेल द्वारे निवेदन दिले होते. मुख्यमंत्री कार्यालयातर्फे त्या निवेदनास तात्काळ प्रतिसाद देत पूढील कारवाहीसाठी मुख्यमंत्री कार्यालया तर्फे चीफ सेक्रेटरी फॉरेस्ट श्री मिलिंद म्हैसकर याना पाठवण्यात आल्याचा मेल संस्थेस प्राप्त झाला असल्याची माहिती बाळकृष्ण देवरे यांनी दिली.

पाल, लंगडा आंबा, गाडऱ्या, जामन्या वनक्षेत्रात वणव्यावर 80% पेक्षा जास्त नियंत्रण मिळवण्यात वनविभागास यश आले असतानाच देवझीरी, वाकी सारख्या दुर्गम भागातील  
वनवणवे रोखण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत दुर्गम भाग, दऱ्या खोऱ्या उंचच उंच गवत असल्याने वणवा नियंत्रणात येत नसल्याचे चित्र आहे भविष्यात अश्या संकटापासून सामना करायचा झाल्यास  जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागा अंतर्गत विशेष तरतूद करून वन कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण आणि अत्याधुनिक साहित्य उपलब्ध करून दिले पाहिजे

- रवींद्र फालक अध्यक्ष वन्यजीव संरक्षण संस्था, जळगांव

सातपुड्यातील जैविक विविधता वाढत असल्याचे चित्र आमच्या अभ्यासातून समोर आले आहे ते सुरक्षित राखण्यासाठी वनविभाग महत्वाची भूमिका निभावत आहे. राज्यातील इतर अभयारण्याच्या दृष्टीने यावल अभयारण्याच्या सुरक्षेसाठी कोणतीही विशेष तरतूद नसल्याने सर्वच बाबतीत वनकर्मचार्यांना संकटांचा सामना करावा लागत आहे हे संस्थेच्या सर्वेक्षणात दिसून आले प्रतिकूल परिस्थितीत तोकडे मनुष्यबळ असूनही देखील जीवावर उदार होऊन कर्मचारी अभयारण्य राखत आहे त्यांना अजून सशक्त करण्याची गरज असल्याने आम्ही मुख्यमंत्री महोदयांना निवेदन देत सातपुड्याच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न करत आहोत आता वनमंत्रालय काय निर्णय घेते या कडे लक्ष लागून आहे

- बाळकृष्ण देवरे , वन्यजीव संरक्षण संस्था , जळगांव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: forest marathi news jalgaon biodiversity crisis in yaval forest area satpuda