esakal | बापरे! चार किलोमीटरचा रस्ता अन्‌ ३०० खड्डे
sakal

बोलून बातमी शोधा

बापरे! चार किलोमीटरचा रस्ता अन्‌ ३०० खड्डे

बापरे! चार किलोमीटरचा रस्ता अन्‌ ३०० खड्डे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव: जळगाव शहर जिल्ह्याचे ठिकाण आहे. शहरातून राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने मोठ्या अवजड वाहनांसह लहान वाहनांची वर्दळ या रस्त्यावर असते. महामार्ग चौपदरीकरणात तरसोद ते चिखली महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्णत्वाकडे आहे. भुसावळकडून जळगाव शहरात येताना तरसोद ते जळगाव शहरातील कालिकामाता दरम्यानचा महामार्ग चार किलोमीटरचा आहे. यात तब्बल ३०० लहान-मोठे खड्डे असल्याचे ‘सकाळ’च्या सर्वेक्षणात आढळले आहे. यामुळे दुचाकी व इतर वाहनधारकांना वाहने जीव मुठीत धरूनच चालवावी लागतात.

हेही वाचा: कामास गती न मिळाल्यास पुन्हा रस्त्यावर - चिमणराव पाटील

वास्तविक, हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. मात्र या विभागाचे अधिकारी केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप सर्वसामान्यांकडून होत आहे. खड्ड्यांमुळे लहान-मोठे अपघात या रस्त्यावर दररोज होतात.

कार उलटून दोन ठार

तरसोद फाट्यावर मोठे खड्डे आहेत. ज्याठिकाणी चौपदरी महामार्ग संपतो त्याठिकाणी रस्ता एकेरी होतो. याठिकाणी कंत्राटदाराने खड्डे बुजविणे, रस्त्यावरील अडचणीचे झाडे काढणे आदीकामे करून वाहतुकीस अडथळा होणार नाही असा रस्ता ठेवणे गरजेचे आहे. मात्र तसे झालेले नाही. अनेक ठिकाणी मार्गदर्शक सूचना फलकही नाही.

यामुळे गेल्या महिन्यात मध्यरात्री कार उलटून दोन जणांचा मृत्यू झाला होता. असे असतानाही या मार्गावरील खड्डे बुजविण्यात आले नाही. महामार्गाचे अधिकारी म्हणतात, हा मार्ग बांधकाम विभागाकडे आहे. बांधकाम विभाग म्हणते हा मार्ग महामार्ग प्राधिकरणाकडे आहे. या भांडणात मात्र वाहनधारकांना मात्र दररोज त्रास सहन करावा लागतोय.

साइडपट्ट्यांवर खड्डे

बांधकाम विभागाने या मार्गावरील साइडपट्ट्या थातूरमातूर मुरूम टाकून बुजविल्या. मात्र त्यावरही खड्डे पडल्याने अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. रस्ता एकेरी असल्याने अवजड वाहने व लहान वाहने एकाच रस्त्यावरून धावतात. त्यात खड्ड्यांमुळे अपघात नेहमीच होतात. रात्री मार्गावर पथदीप नसल्याने अंधारात वाहन चालविणे अधिकच कठीण होत आहे.

loading image
go to top