
जळगाव : 3 स्टार हॉटेलचे लाखांचे बिल बुडविणारा अटकेत
जळगाव : मी पुण्यातील एका नामांकित कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणी करत अजिंठा चौकातील थ्रीस्टार हॉटेल महिंद्रामध्ये दोन महिने एका भामट्याने मुक्काम ठोकला होता. हॉटेलचे एक लाख ८९ हजार रुपयांचे बिल अदा न करता फरारी झालेल्या संशयितास एमआयडीसी पोलिसांनी मुंबईतून अटक केली.
जळगाव शहरातील अजिंठा चौफुलीवरील थ्रीस्टार हॉटेल महिंद्रामध्ये मयूर अशोक जाधव (वय ३६, रा. गणेश ऑर्किड, गंगापूर रोड, नाशिक) याने आपण पुण्यातील एका नामांकित कंपनीत मॅनेजर असल्याचे सांगत १४ फेब्रुवारी ते १६ एप्रिलदरम्यान बस्तान मांडले होते. या काळात हॉटेलमालक आणि कर्मचारी, मॅनेजर यांचा विश्वास संपादन करून रेस्टॉरंट व बिअर बारमध्ये यथेच्छ दारू ढोसली. त्याचे एक लाख ८९ हजार ५९० रुपयांचे बिल निघाले. बिल देण्याची वेळ आल्यावर या भामट्याने हॉटेल मॅनेजरच्या हातात चेक देत पोबारा केला होता. या प्रकरणी ९ मेस हॉटेलमालक तेजेंद्रसिंग अमितसिंह महिंद्रा यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात मयूर जाधव याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता.
हेही वाचा: 14 वर्षांपासून बेपत्ता सुनील सोशल मीडियामुळे पोहचला घरी!
मुंबईतून आवळल्या मुसक्या
गुन्हा दाखल झाल्यानंतर एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या पथकातील पोलिस नाईक इम्रान सय्यद, सुधीर सावळे, गोविंदा पाटील यांनी मिळालेल्या माहितीवरून मुंबई गाठली. पथकाने तीन दिवस मुंबईला मुक्काम केल्यानंतर संशयित मयूर जाधव याला अटक केली. त्याच्याकडून हॉटेल महिंद्राचे बाकी असलेले एक लाख ८९ हजार ९५० रुपये हस्तगत केले. संशयित मयूर जाधव याला न्यायालयात हजर केले असता, कारागृहात रवानगी करण्यात आली.
हेही वाचा: ''कोणाच्या गाडीवर पाहीले'' विचारल्याचा आला राग; विवाहितेस मारहाण
Web Title: Fraud Man Arrested For Non Payment Of Hotel Bills In Jalgaon
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..