केळीच्या व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्यांचीच केली २० लाखांची फसवणूक 

सचिन जोशी
Saturday, 31 October 2020

शेतकऱ्यांकडून केळी विकत घेऊन परराज्यात ठोक विक्री करण्याचा व्यवसाय करतात. राजस्थानमधील अरिहंत केळी सप्लायर्ससोबत केळी खरेदी-विक्रीचा व्यवहार करत होते.

जळगाव ः  व्यापाऱ्यांकडून शेतकऱयांची फसवणूक होत असल्याच्या घटना नेहमी समोर येत असतात. परंतू आता व्यापारी व्यापारींच फसवणूक करण्याचे प्रकार घडू लागले आहे. असाच प्रकार जळगाव शहरातील आणि भुसावळमधील अशा दोघा केळी व्यापाऱ्यांची मुंबई व राजस्थानमधील केळी व्यापाऱ्यांनी २० लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

आवश्य वाचा- तिढा सुटला : चाळीसगावला सोमवारपासून कांदा खरेदी !
 

शहरातील केळी व्यापारी सूर्यकांत विधाते यांचे मल्हारा मार्केटमध्ये जयकिसान केळी सप्लायर्स हे दुकान असून, २५ ते ३० वर्षांपासून ते शेतकऱ्यांकडून केळी विकत घेऊन परराज्यात ठोक विक्री करण्याचा व्यवसाय करतात. राजस्थानमधील अरिहंत केळी सप्लायर्ससोबत केळी खरेदी-विक्रीचा व्यवहार करत होते. त्या कंपनीचे मालक शिवकुमार महावीरप्रसाद जैन यांच्या मागणीनुसार २३ जून २०१७ ते १८ जुलै २०१७ च्या दरम्यान विधाते यांनी वेळोवेळी त्यांना केळीचा माल पाठविला होता. 
सूर्यकांत यांनी शिवकुमार यांना सुमारे ३५ लाख ८५ हजार ३० रुपयांचा माल पाठविला होता. शिवकुमार जैन याने त्यांना २५ लाख ८० हजार रुपये अदा केले. उर्वरित दहा लाखांची रक्कम दिली नसल्याने विधाते यांनी पाठपुरावा केला, त्यांना भेटण्यासाठी ते राजस्थानला गेले. परंतु कंपनीमालकाने भेटण्यास टाळाटाळ केली. अखेरीस विधाते यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. 

भुसावळच्या व्यापाऱ्यालाही गंडविले 

भुसावळ येथील शालिक दौलत सोनवणे हे केळी व्यापारी असून, त्यांचे देखील मल्हारा मार्केटमध्ये केला सप्लायर्स नावाचे दुकान आहे. त्यांनीही असाच एक व्यवहार मुंबईतील कांदीवली येथील व्यापारी संतोष रामनरेश गुप्ता (रा. अतुल टॉवर, हिराणेवाडी, केला मार्केट) यांच्याशी केला होता. २० एप्रिल २०१८ पासून ते १५ जुलै २०१९ पर्यंत दोघांमध्ये सुरळीत व्यवहार झाला. या काळात सुमारे ३७ लाख ८२ हजार ५४२ रुपयांचा माल पाठविण्यात आला होता. गुप्ता यांनी सोनवणेंना ३७ लाखांपैंकी केवळ २७ लाख ६१ हजार ६०० रुपये इतकी रक्कम दिली आहे. उर्वरित दहा लाख २० हजार ९४२ रुपयांची रक्कम देण्यास टाळाटाळ केली. अखेर दौलत सोनवणे यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संतोष गुप्ताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास रवींद्र सोनार करीत आहेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fraud of twenty million by banana traders against two in Rajasthan, Mumbai