तिढा सुटला : चाळीसगावला सोमवारपासून कांदा खरेदी !

दिपक कच्छवा
Saturday, 31 October 2020

केंद्र शासनाने २५ टनांपेक्षा जास्त कांदा व्यापाऱ्यांनी साठवणूक करू नये, अशी अट घातली. याविरोधात व्यापाऱ्यांनी कांदा खरेदीला सर्वत्र विरोध दर्शवून कांदा खरेदीविरोधात संप पुकारला होता.

चाळीसगाव  : कांदा साठविण्याबाबत केंद्र शासनाने दिलेल्या या निर्णयाविरोधात गेल्या आठवडाभरापासून कांदा खरेदी बंद करण्यात आली. परंतु शासनाने या निर्णयाला स्थगिती दिल्यामुळे सोमवार (ता. २)पासून चाळीसगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा खरेदी करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचादेखील फायदा होणार असून, आर्थिक नुकसान टळणार आहे. 

आवश्य वाचा- रूग्‍ण घटले तरी ॲन्टिजेन किटचा तुटवडा; संपर्कातील व्यक्तींच्या टेस्टिंग नाहीच 
 

चाळीसगाव तालुक्यातील बहुतांश शेतकरी हे मोठ्या प्रमाणावर कांदालागवड करीत असतात. चाळीसगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पन्न येत असल्याने येथील शेतकऱ्यांना नांदगाव-सटाणा-मालेगाव या ठिकाणी कांदा विक्रीसाठी घेऊन जावं लागत होते, ही बाब लक्षात घेऊन चाळीसगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने उपबाजार समितीत गेल्या दोन वर्षांपासून स्वतंत्र कांदा मार्केट सुरू करण्यात आले. या ठिकाणी दररोज सध्या जवळपास १०० वाहने कांदा विक्रीसाठी येत असून, यातून जवळपास पन्नास लाखांची उलाढाल होत असते. यातून चाळीसगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला जवळपास तीस ते पस्तीस हजार रुपये उत्पन्न प्राप्त होते. सध्या कांद्याला भावदेखील तेजीत असल्याने उत्पन्न चांगल्या प्रकारे आहे. परंतु केंद्र शासनाने २५ टनांपेक्षा जास्त कांदा व्यापाऱ्यांनी साठवणूक करू नये, अशी अट घातली. याविरोधात व्यापाऱ्यांनी कांदा खरेदीला सर्वत्र विरोध दर्शवून कांदा खरेदीविरोधात संप पुकारला होता. त्यानंतर केंद्र शासनाने हा निर्णय स्थगित करून कांदा खरेदी करण्यासाठी मुभा दिली. यामुळे आता चाळीसगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारपासून कांदा खरेदीला सुरवात करण्यात येणार आहे. 

उपबाजार समितीत कांदा खरेदी-विक्री 
गेल्या चार ते पाच महिन्यांपासून चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा खरेदी-विक्रीचे व्यवहार होत होते. परंतु येत्या सोमवारपासून येथील उपबाजार समितीत कांदा खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू होणार असल्याची माहिती बाजार समितीचे प्रभारी सचिव सतीश पाटील यांनी दिली. 

अशी आहे आकडेवारी 
- उपबाजार समितीत सध्या होत असलेली आवक - १०० वाहने 
- कांदा खरेदी-विक्रीतून होणारी आवक - ५० लाख 
- बाजार समितीत एकूण व्यापारी - जवळपास दहा  
 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chalisgaon rift between traders and farmers buys onions from monday