Jalgaon News : गाळेधारकांना महापालिकेची नोटीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jalgaon municipal corporation

Jalgaon News : गाळेधारकांना महापालिकेची नोटीस

जळगाव: महापालिकेच्या २८ व्यापारी संकुलातील (Complex) गाळे दुसऱ्यांच्या नावावर असलेल्या गाळेधारकांना हस्तातंरण फी भरून गाळे नावावर करून घेण्याबाबत महापालिकेने गाळेधारकांना नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. (Gale Recovery Department of Municipal Corporation has started work of tracing transferred Gale holders issuing notices to them jalgaon news)

महापालिका व्यापारी संकुलातील गाळेधारकांनी परस्पर गाळे विक्री केली आहे. मात्र, खरेदी करणाऱ्यांचे अद्यापही त्या गाळ्यावर नाव लागलेली नाहीत. अशा हस्तांतरण केलेल्या गाळेधारकांचा शोध घेऊन त्यांना नोटिसा बजाविण्याचे काम महापालिकेच्या गाळे वसुली विभागाने सुरू केले आहे.

त्यांना आठ दिवसांची मुदत दिली जाणार असून, त्यात हस्तांतरणाची ठरलेली फी भरून हस्तांतरण करून घेणे आवश्यक आहे. दिलेल्या नोटिसीच्या मुदतीत हस्तांतरण न केल्यास ते गाळे महापालिका जप्त करणार आहे.

महापालिकेच्या मालकीचे २८ व्यापारी संकुले आहेत. त्यापैकी २२ संकुलाच्या गाळेधारकांची कराराची मुदत २०१२ ला संपली आहे. मात्र, त्याच्या कराराबाबत अद्यापही शासनाकडे वाद प्रलंबीत आहेत. त्यातच अनेक संकुलातील गाळेधारकांनी महापालिकेला न कळविता संकुलातील त्यांचे गाळे दुसऱ्यांना परस्पर विक्री केली आहे, अशा गाळेधारकांचा मागे शोध घेण्यात आला होता.

त्यानुसार २५ गाळेधारकांनी हस्तांतरण करण्याची प्रक्रिया केली होती. तसेच ३०० गाळेधारकांचे हस्तांतरण करण्याचे प्रस्ताव आले होते. मात्र, गाळे हस्तांतरण फी आकारणीबाबत धोरण ठरले नव्हते.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

महापालिकेकडे हस्तांतरण धोरण ठरले असून, आता गाळे हस्तांतरण करण्याच्या प्रक्रियेला सुरवात होणार आहे. आठ दिवसांत हस्तांतरण केलेल्या गाळेधारकांना नोटिसा देऊन त्यांना आठ दिवसांत हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत दिली जाणार आहे.

रेडीरेकनर दरानुसार आकारणी

शासनाच्या निर्देशानुसार हस्तांतरण गाळ्यांची शुल्क आकारणीचे धोरण महापालिका प्रशासनाने महासभेत निश्‍चित केले आहे. तळमजल्याच्या हस्तांतरासाठी रेडीरेकनर दरानुसार १५ टक्के, पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यासाठी १० टक्के आकारणी करण्यात येईल. त्यात घसारा शुल्कही कमी करण्यात येईल.

पूर्ण थकबाकी भरण्याची गरज

गाळे नावावर हस्तांतरण करावयाचे असल्यास गाळेधारकाने प्रथम आपली संपूर्ण थकबाकी भरणे आवश्‍यक आहे. थकबाकी भरलेल्यांच्या नावावर गाळे हस्तातंरण प्रक्रिया करण्यात येणार आहेत.