धुळे : अखेर सोनसाखळी चोरटे एलसीबीच्या तावडीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gold stolen dhule

धुळे : अखेर सोनसाखळी चोरटे एलसीबीच्या तावडीत

धुळे : शहरातील पांझरा नदीकिनारी शिवाजी रोडवर १५ मार्चला मॉर्निंग वॉक करणाऱ्या व्यापाऱ्याची सात तोळ्यांची सोनसाखळी धूमस्टाइल लुटणाऱ्या टोळीला अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) शुक्रवारी (ता. २५) सकाळी शिताफीने जेरबंद केले. चाळीसगाव चौफुलीवर संशयित दोघांना ताब्यात घेतले. यातील एका संशयितावर विविध पोलिस ठाण्यात तब्बल १३ गुन्हे दाखल आहेत.

शहरातील गुळाचे व्यापारी ललित मोतीराम लोढा १५ मार्चला सकाळी साडेसहाला शिवाजी रोडवर मॉर्निंग वॉकसाठी गेले. श्री स्वामी समर्थ केंद्रापुढे लहान पुलाजवळ पल्सरवर आलेल्या दोन चोरट्यांनी लोढा यांच्या गळ्यातील सात तोळ्यांची सोनसाखळी हिसकावून पळण्याचा प्रयत्न केला. श्री. लोढा यांच्या तक्रारीवरून धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या घटनेने शहरात खळबळ उडाली होती.

गुन्ह्याचा समांतर तपास एलसीबी करत असताना पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार शहरात चेन स्नॅचिंग करणाऱ्या व्यक्तींच्या वर्णनाप्रमाणे दोन संशयित पाठीला बॅग लावून शहरात फिरत होते. याआधारे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील, योगेश राऊत, बाळासाहेब सूर्यवंशी आदींचे पथक नेमण्यात आले. ते शुक्रवारी (ता. २५) सकाळी गस्त घालत असताना चाळीसगाव रोड चौफुली येथे दोन संशयित पाठीवर बॅग लावून उभे असल्याचे दिसले. पथकाने त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत संशयितांनी असू शाजमान सय्यद आणि मोहम्मद अनू सय्यद (दोघे रा. पाटीलनगर, भास्कर हायस्कूलजवळ, आंबेवली, कल्याण) असे नाव सांगितले. संशयितांनी दोघांसह सोबत फिरोज सय्यद, शोएब शेख तनवीर गंजावाल्याचा पुतण्या (दोन्ही रा. वॉर्ड क्रमांक २, धनगर वस्ती श्रीरामपूर, जि. नगर) व इम्रान शेख (रा. रमजानपुरा, मालेगाव, जि. नाशिक) मालेगाव येथून दोन दुचाकीवर १५ मार्चला धुळ्यात पहाटे पाचच्या सुमारास आल्याचे सांगितले.

श्री. लोढा यांची सोनसाखळी हिसकावल्याची कबुली संशयितांनी दिली. संशयित दोघांना ताब्यात घेत शहर पोलिसांच्या हवाली करण्यात आले. मोहम्मद अनू सय्यद याच्यावर नेरूळ, तळेगाव, दाभाडी, वाशी पोलिस ठाण्यात विविध १३ गुन्हे दाखल आहेत, तर असू शाजमान सय्यदवर हिललाइन पोलिसांत गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कामगिरी पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश पाटील, योगेश राऊत, बाळासाहेब सूर्यवंशी, संजय पाटील, प्रकाश सोनार, संदीप सरग, कुणाल पानपाटील, उमेश पवार, रविकिरण राठोड, विशाल पाटील, श्रीशैल जाधव, अमोल जाधव, महेंद्र सपकाळ आदींनी केली.

Web Title: Gold Chain Stolen Lcb Criminal Kalyan Malegaon

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top