
दहा वर्षांपासून गाव प्रगतीबाबत मागे पडले आहे. या गावात अनेक मातब्बर आणि बुद्धिजीवी लोक निवडणुकीपासून लांब असतात.
:चोपडा : तालुक्यात होऊ घातलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये ५२ पैकी ११ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. ४१ ग्रामपंचायतींची निवडणूक होत असून, निवडणुकीसाठी आजी-माजी तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
आवश्य वाचा- पुरणपोळी, बिबडी, मेहरुण बोरांना ‘जीआय’मानांकनाचा प्रस्ताव
चहार्डी, वीरवाडे, गोरगावले बुद्रुक, घोडगाव, हातेड बुद्रुक, मंगरूळ, विटनेर, वर्डी या गावांमध्ये निवडणुका चुरशीच्या होणार आहेत. तालुक्यात सर्वांत जास्त १७ सदस्य संख्या असलेली चहार्डीची निवडणूक जिल्हा बँकेचे संचालक व माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. सुरेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य डॉ. नीलम पाटील, पंचायत समितीच्या सभापती मालूबाई रायसिंग, चोसाका संचालक नीलेश पाटील, बाजार समिती संचालक भरत पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे.
वीरवाडेची निवडणूक पंचायत समितीचे सदस्य आत्माराम म्हाळके, जिल्हा परिषदेच्या सभापती उज्ज्वला म्हाळके यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. घोडगावच्या ११ जागांसाठी नूतन शिक्षण प्रसारक मंडळ संचालक जवरूलाल जैन, प्रकाश पाटील, दिलीप कोळी, माजी सरपंच संजय पाटील, सूतगिरणी संचालक प्रकाश रजाळे, माजी सभापती सविता पाटील, जिल्हा परिषद सदस्य हरीश पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
तालुक्याची राजधानी म्हणून ओळखले जाणारे हातेड बुद्रुकसाठी माजी शिक्षक आमदार दिलीप सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य गजेंद्र सोनवणे, माजी उपसरपंच मनोज पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मंगरूळची निवडणूक चोसाकाचे चेअरमन व सरपंच अतुल ठाकरे, साखर कारखान्याचे माजी चेअरमन यशवंत निकम यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे.
आवश्य वाचा- पाटणादेवी जंगलात वन्यजीव विभागाकडूनच जिवंत झाडांची कत्तल ?
अकुलखेड्यात पंचायत समितीचे माजी उपसभापती सुनील महाजन, पंचायत समितीचे माजी सभापती गोपाळराव सोनवणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत आणि विकास संस्थेत महिलांना बिनविरोध निवडून आणणाऱ्या जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्षा इंदिराताई पाटील यांच्यासाठी या गावात महिलांच्या हाती ग्रामपंचायत आणि महिलांचे नाव मालमत्ता कर लावण्याचा विषय पुढे सातत्याने सुरू ठेवण्यासाठी प्रतिष्ठेची निवडणूक ठरणार आहे. वर्डीत पंचायत समितीचे माजी सभापती विनायकराव चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजय पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती कांतिलाल पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. वढोद्याची निवडणूक माजी सभापती गोकुळ पाटील व बाजार समिती संचालक अरुण पाटील, युवासेना तालुकाप्रमुख गोपाळ चौधरी यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरणार असून, या ठिकाणी चुकीच्या जागेवर उमेदवारी दाखल केल्याने सेनेची एक जागा बिनविरोध झाली आहे.
वाचा- चांगली बातमी: अतिवृष्टी च्या नुकसानीची मदत 94 टक्के शेतकऱ्यांना वाटप
चहार्डीकरांना सक्षम नेतृत्वाची गरज
चहार्डी सर्वांत मोठे गाव आहे. या गावाला सक्षम नेतृत्व मिळणे गरजेचे आहे. (कै.) कडू चौधरी यांच्यासारख्या नेतृत्व मिळावे, ही अपेक्षा चहार्डीवासीयांना आहे. दहा वर्षांपासून गाव प्रगतीबाबत मागे पडले आहे. या गावात अनेक मातब्बर आणि बुद्धिजीवी लोक निवडणुकीपासून लांब असतात. गावाची दशा आणि दिशा पाहता बुद्धिजीवी लोकांनी पुढे येण्याची आणि गावाला विकासात्मक दृष्टीने पुढे नेण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे