ग्रामपंचायत निवडणूक ः बहुतांश ठिकाणी तिरंगी लढतीची शक्यता 

देविदास वाणी
Saturday, 26 December 2020

ग्रामीण भागात मात्र निवडणुकीबाबत कमालीची उत्सुकता आहे. कोण अर्ज भरतो, कोणाला तिकीट मिळणार नाही, कोण बंडखोरी करेल आदींबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

जळगाव : जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा फीव्हर दिवसेंदिवस वाढत आहे. एकीकडे थंडीचा जोर वाढत असताना निवडणुकीमुळे वातावरण गरम होताना दिसत आहे. अनेक गावांमध्ये निवडणुकीच्या रिंगणात दोनऐवजी तीन पॅनलमध्ये निवडणुका लढविण्याच्या योजना आखल्या जात आहेत.

सत्ताधारी व विरोधी पक्षाचे आमदार आपला कस पणाला लावून आपल्याच पक्षाचे अधिकाधिक मताधिक्य घेऊ शकणाऱ्या इच्छुकांचा शोध घेऊन त्यांची नावे जाहीर करण्याच्या कामात लागले आहेत. अर्ज भरण्याच्या कामात सलग तीन दिवस सुटी (२५ ते २७) असल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे. तीन दिवसांत अर्ज भरता आले असते व नंतर प्रचाराचा अधिक वेळ मिळाला असल्याच्या भावना इच्छुकांच्या आहेत. 

जिल्ह्यात ७८३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. बुधवार (ता. २३)पासून अर्ज भरण्यास सुरवात झाली. गुरुवारी जिल्हाभरात ७० उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. शुक्रवारी, शनिवारी (ता. २६) व रविवारी (ता. २७) तीन दिवस सुट्या असल्याने उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अनेकांनी शुक्रवारी तहसील कार्यालयात अर्ज भरण्याच्या प्रक्रियेबाबत विचारणा करण्यासाठी गर्दी केली. मात्र कार्यालय बंद असल्याने त्यांना माहिती मिळाली नाही. 

ग्रामीण भागात मात्र निवडणुकीबाबत कमालीची उत्सुकता आहे. कोण अर्ज भरतो, कोणाला तिकीट मिळणार नाही, कोण बंडखोरी करेल आदींबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. केव्हा एकदाचा सोमवार येऊन उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात होते. सोमवार ते बुधवार (ता. ३०) असे सलग तीन दिवस इच्छुकांची अर्ज भरण्यास भाऊगर्दी होणार असल्याचे चित्र आहे. 

कालपर्यंत झालेले तालुकानिहाय दाखल अर्ज 
जळगाव २, जामनेर ५, धरणगाव २, एरंडोल २, पारोळा ३, भुसावळ ७, मुक्ताईनगर १, बोदवड १४, रावेर ८, अमळनेर ७, चोपडा ३, पाचोरा ६, भडगाव २, चाळीसगाव ८. 

 

 

निवडणूक कार्यक्रम 
अर्ज दाखल करणे ः २३ ते ३० डिसेंबर 
छाननी ः ३१ डिसेंबर 
अर्ज माघारी, चिन्हवाटप ः ४ जानेवारी २०२१ 
मतदान ः १५ जानेवारी 
मतमोजणी ः १८ जानेवारी 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gram panchayat election marathi news jalgaon political triangular fight