
गावाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्याच्या समर्थकांनी त्याची उमेदवारी दाखल केली. त्यासाठी नाशिक येथे जाऊन समर्थकांनी त्याचा ऑनलाईन उमेदवारी अर्ज सादर केला होता.
रावेर : तालुक्यातील बक्षीपूर येथील ग्रामपंचायत निवडणुकीत दुसऱ्या प्रभागातून स्वप्नील मनोहर महाजन हा युवक उमेदवार नाशिक येथील तुरुंगात असताना देखील प्रचंड मतांनी विजयी झाला आहे. काल (ता १८) सायंकाळी उशिरा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निकाल जाहीर केल्यानंतर ही बाब समोर आली आहे.
आवर्जून वाचा- कोरोनाच्या काळात गायक गावी आला; आणि गावाचा कारभारी झाला!
रावेर शहराजवळच असलेल्या बक्षीपूर येथील रहिवासी स्वप्नील मनोहर महाजन या युवकाला मार्च महिन्यात झालेल्या रावेर येथील जातीय दंगलीत पोलिसांनी संशयित म्हणून अटक केली होती.त्याची जामिनावर सुटका झाल्यानंतर पोलिसांनी पुन्हा त्याच्यावर एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करून त्याची रवानगी नाशिक तुरुंगात केली होती. सध्याही तो तुरुंगातच आहे.
२१४ मतांनी विजयी
दरम्यान, गावाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्याच्या समर्थकांनी त्याची उमेदवारी दाखल केली. त्यासाठी नाशिक येथे जाऊन समर्थकांनी त्याचा ऑनलाईन उमेदवारी अर्ज सादर केला होता. त्याच्याविरुद्ध गावातीलच संदीप महाजन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. सोमवारी झालेल्या मतमोजणीनंतर स्वप्नील महाजन याला २९१ आणि प्रतिस्पर्धी संदीप महाजन याला अवघी ७७ मते मिळाल्याचे व स्वप्नील महाजन हा २१४ मताधिक्याने विजयी झाल्याचे आढळून आले.
आवश्य वाचा- अभ्यास, करिअर शोधता..शोधता उच्चशिक्षीत तरुणाच्या हाती गावगाड्याचा कारभार
न फिरला, न प्रचार केला तरी..
निवडणुकीत स्वतः मतदान न करता आणि स्वतः प्रचार न करता तुरुंगात राहून ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्याचे राज्यातील हे आगळे वेगळे उदाहरण असावे.
दंगल प्रकारणी संशयीत म्हणून तुरूगांत
दंगलीतील अन्य चार संशयित आरोपींची एमपीडी कारवाईतून औरंगाबाद उच्च न्यायालयाने नुकतीच मुक्तता केली आहे. त्यांच्यावरील एमपीडीए कारवाईचा आदेश उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला आहे मात्र स्वप्नील महाजन याने अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल न केल्याने तो अद्यापही तुरुंगात आहे. त्याच्यासोबतच्या चौघांची मात्र सुटका झाली आहे. स्वप्निलच्या या आगळ्यावेगळ्या यशाबद्दल शहर आणि परिसरात चर्चा सुरू आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे