esakal | नांद्रे परिसरात पावसाचा हाहाःकार, पिकांना मोठा फटका
sakal

बोलून बातमी शोधा

nandre

नांद्रे परिसरात पावसाचा हाहाःकार, पिकांना मोठा फटका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव: मन्याड धरणाजवळ असलेल्या नांद्रे (ता. चाळीसगाव) गावाला पाण्याचा मोठा फटका बसला. मन्याड धरण अगोदरच ओसंडून वाहत असताना त्यात साकोरा गावाजवळील मोरखडी बंधाऱ्याचे पाणी आल्याने सुमारे एक लाख क्युसेकचा विसर्ग सुरू झाला. त्यात मुसळधार पाऊस सुरू झाल्याने काही वेळात नांद्रे गाव पुराच्या पाण्यात वेढल्या गेले. ज्यामुळे काही घरांसह पिकांचे अतोनात नुकसान झाले.

हेही वाचा: मालेगाव : जुन्या महामार्गासह प्रमुख रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण

मंगळवारच्या रात्री सुरू झालेला पाऊस बुधवारी देखील सुरुच होता. अचानक वाढलेल्या या पावसामुळे नांद्रेकरांची झोपच उडाली. गावात पुराचे पाणी शिरल्याने ग्रामस्थांनी संपूर्ण रात्र जागून काढली. नदीच्या पाण्याला जाण्यासाठी पुरेशी जागा न मिळाल्याने बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पाणी शिरले.

ज्यामुळे कापसासह इतर अनेक पिके उद्ध्वस्त झाली. काही शेतांमधील तर मातीच वाहून गेली होती. ग्रामस्थ पाण्यामुळे संकटात असताना मन्याडवरील माणिकपुंज धरण फुटल्याची अफवा पसरल्याने एकच गोंधळ उडाला. ग्रामस्थांनी भीतीपोटी काकडणे रस्त्याकडील भिल्ल वस्तीच्या टेकडीचा आधार घेतला.

सुदैवाने काही वेळानंतर पाऊस कमी होऊन नदीचे पाणीही ओसल्याने अफवेमुळे पसरलेली भीती दूर झाली. या पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस, कपाशीसह इतरही पिकांचे मोठे नुकसान झाल्याने त्यांचे तातडीने पंचनामे करून भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे. मंगळवार अखेर तालुक्यात ८५० मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

आमदारांकडून पाहणी

मंगळवारी रात्री झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या नांद्रे, पिंपळवाढ निकुंभ, रोहिणी, करजगाव, राजदेहरे आदी गावांमध्ये जाऊन आमदार मंगेश चव्हाण यांनी नुकसानाची पाहणी केली. त्यांच्यासमवेत प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसीलदार अमोल मोरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

तातडीने भरपाई मिळावी : अजय पाटील

नांद्रे परिसरात झालेल्या नुकसानाची आज पंचायत समितीचे सभापती अजय पाटील यांनी पाहणी केली. या वेळी जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मंगेश पाटील, शेनपडू पाटील, पंचायत समितीचे सदस्य शिवाजी सोनवणे व गावातील पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, नुकसान झालेल्यांना शासनाने तातडीने भरपाई मिळवून देत, या संकटात मदतीचा हात द्यावा, अशी मागणी सभापती अजय पाटील यांनी केली. या संदर्भात माजी आमदार राजीव देशमुख यांच्याशी आपण बोललो असून, ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे या संदर्भात पाठपुरावा करणार असल्याचे पाटील यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

loading image
go to top