esakal | मालेगाव : जुन्या महामार्गासह प्रमुख रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण
sakal

बोलून बातमी शोधा

malegaon

मालेगाव : जुन्या महामार्गासह प्रमुख रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण

sakal_logo
By
प्रमोद सावंत : सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : शहरातील जुन्या महामार्गाचे काम संथगतीने सुरु आहे. महामार्गावरील जाफरनगर भागातील खड्डे व शहरातील विविध प्रमुख रस्यांची खड्ड्यांमुळे झालेली चाळण याच्या निषेधार्थ आवामी पार्टीतर्फे गुरुवारी (ता.९) जुन्या महामार्गावरील जाफरनगर भागात खड्ड्यांमधील सांडपाण्यात लोळण घेत अध्यक्ष रिजवान अन्सारी उर्फ बॅटरीवाला यांनी लक्षवेधी आंदोलन केले.

गटार व पावसाच्या सांडपाण्यात सुमारे तासभर ते लोळत होते. दोन आठवड्यापुर्वी महामार्ग व कुसुंबा रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये फुलांच्या पाकळ्या टाकून गांधीगिरी पध्दतीने पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले होते. त्याची दखल न घेतल्याने आज पुन्हा आंदोलन करण्यात आले.

malegaon

malegaon

महापालिकेचे अंदाजपत्रक सुमारे चारशे कोटीचे आहे. गैरव्यवहार, भ्रष्टाचारामुळे कामे निकृष्ट दर्जाची होतात. शहरवासियांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. या सर्व प्रकारांकडे लक्ष वेधण्यासाठी तसेच रस्ते, गटार, पथदीप या प्राथमिक नागरी सुविधा तातडीने व उच्च दर्जाच्या उपलब्ध करुन द्याव्यात या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे श्री. बॅटरीवाला यांनी सांगितले. आज दुपारी आंदोलनस्थळी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी विविध चित्रपटातील गाणी वाजवत हे आंदोलन केले. आंदोलनादरम्यान श्री. बॅटरीवाला सांडपाण्यात लोळण घेत पाणी में मछली छोडो, ये गिरणा है के मोसम नदी है । कार्पोरेशन का काम देखो ॥ असे म्हणत हाेते. दोन दिवसापुर्वी मध्यवर्ती गणेशोत्सव समिती व शांतता समितीच्या बैठकीत शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्‍नी जोरदार खडाजंगी झाली होती.

आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी बुधवारी महसूल व पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गणेशोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत तातडीने रस्त्यांची डागडुजी करु असे आश्‍वासन दिले असताना आज पुन्हा हे आंदोलन झाले. आंदोलनकर्त्यांनी स्वत: स्वखर्चाने दोन ट्रॅक्टर मुरुम मागवून जुन्या महामार्गावरील खड्ड्यांमध्ये टाकला. रिजवान अन्सारी यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलनात अब्दुल माजीद, अबु सुफीयान, यासर अराफात, सलीम अहमद, इम्रान अन्सारी, मोहंमद फैजान, नवीद अख्तर आदी कार्यकर्त्यांचा समावेश होता.

हेही वाचा: 'ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्यांचा घोटाळा मांडणार'

शहरातील रस्त्यात खड्डे की खड्ड्यांवर रस्ते असा प्रश्‍न पडला आहे. खड्ड्यांमुळे अनेक लहान-मोठे अपघात होत आहेत. सोशल मिडीयात जोरदार टिका होत असून विविध भागातील रस्ते, सांडपाणी, चिखलाचे साम्राज्य, जलमय झालेला परिसर आदींसह छायाचित्र झळकत आहे. गेली तीन दिवस संततधार पाऊस सुरु होता. आज पावसाने उघडीप दिली असून ऊन पडले आहे. प्रशासनाने युध्द पातळीवर दर्जेदार पध्दतीने रस्त्यांची डागडुजी केली पाहिजे. मोसम पुल व शिवतिर्थावरील खड्डे आठवड्यापुर्वी बुजविण्यात आले होते. मात्र पुन्हा जैसेथे परिस्थिती झाली. त्यावरुनच कामाचा दर्जा लक्षात येतो.

loading image
go to top