
धुळवडीला गालबोट; नाचण्याच्या कारणाने दोन गटात हाणामारी
साक्री : होळी धुलीवंदन निमित्त डीजेच्या तालावर नाचत असतानाच झालेल्या वादावरून येथे आज दोन गटात हाणामारीची घटना घडली. यात तिघे गंभीर तर अन्य 8 ते 10 जण जखमी झाले. या घटनेमुळे मात्र धुळवडीला गालबोट लागले.
आज धुलीवंदन निमित्त सर्वत्र डीजेच्या तालावर नाचून धुळवडीचा आनंद साजरा होत असताना येथे मात्र गालबोट लागले. प्रत्यक्षदर्शीच्या सांगण्यानुसार येथील भोई गल्ली व चाँदतारा मोहला परिसरात भोई गल्ली येथील काही तरुण डीजे च्या तालावर नाचत असताना हे तरुण व काही मुस्लिम महिलांसह तरुणांमध्ये बाचाबाची झाली. याचे पर्यावसान पुढे हाणामारीत झाले व यात दगडफेकसह लाठ्या-काठ्या, धारधार शस्त्र देखील वापरण्यात आल्याचे सांगण्यात आले. यात चेतन मोरे, अजय रामोळे, कैलास रामोळे यांच्यासह दोन्ही बाजूंचे अन्य आठ ते दहा जण जखमी झाले होते.
घटनेनंतर तत्काळ अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी साक्रीत भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. तर सायंकाळच्या सुमारास जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील हे देखील साक्रीत दाखल झाले होते. या घटनेनंतर शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नसल्याने घटनेचे नेमके कारण समजू शकलेले नाही.