जळगाव जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पांना चालना मिळणार

देविदास वाणी
Saturday, 13 February 2021

वरखेड लोंढे धरण क्षेत्रास वाळूक्षेत्र घोषित करुन याठिकाणी होणाऱ्या वाळू साठयाच्या विक्रीतून मिळणारा निधी हा जिल्ह्यातील प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यास वापरावा..

जळगाव ः तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील प्रलंबित पाटबंधारे प्रकल्पांसंबंधीच्या अडचणी सोडविण्यासाठी लवकरच मंत्रालयात आढावा बैठक घेऊन या प्रकल्पांना चालना देण्यात येईल. महामंडळामार्फत सुरु असलेल्या प्रकल्पांच्या प्रलंबित सुधारीत प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव तातडीने सादर करावेत. असे आदेश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील यांनी आज येथे दिले. 

आवर्जून वाचा- धक्कादायक! पिता-पुत्राचे सुरू होते भांडण; वडिलांनी चाकु हिसकावताच घडले भयंकर
 

जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाच्या प्रकल्पांची आढावा बैठक येथील तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या सभागृहात मंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. यावेळी ते बोलत होते. आमदार अनिल पाटील, आमदार किशोर पाटील, माजीमंत्री एकनाथराव खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, मनीष जैन, राजेश देशमुख, दिलीप वाघ, तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक बी. एस. स्वामी, मुख्य अभियंता एम. एस. आमले, अधिक्षक अभियंता पी. आर. मोरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाळासाहेब घोरपडे, कार्यकारी अभियंता गोकुळ महाजन, जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील आदी उपस्थित होते. 

आवश्य वाचा- बऱ्हाणूपर- अंकलेश्‍वरचे चौपदरीकरण नाहीच! भूसंपादन खर्चिक 
 

मंत्री पाटील म्हणाले की, पाडळसे येथील निम्न तापी प्रकल्पात येत्या तीन वर्षात पाणीसाठा होण्यासाठी आवश्यक कामाचे नियोजन करावे. यासाठी दरवर्षी लागणाऱ्या खर्चाचे अंदाजपत्रक सादर करावे. या धरणाच्या डिझाईनचे काम एक महिन्याच्या आत पूर्ण करा. जिल्ह्यातील प्रकल्पांना या आर्थिक वर्षात जी अर्थसंकल्पीय तरतुद करण्यात आली आहे. त्यापैकी काही निधी मिळणे बाकी आहे. सदरचा निधी लवकरात लवकर मिळाल्यास कामे पूर्ण करता येतील अशी माहिती अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली, त्यासाठी तातडीने वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येऊन यावर तोडगा काढण्याची सुचनाही त्यांना मंत्री पाटील यांनी केली. 

वरखेड लोंढे धरण वाळूक्षेत्र घोषीत… 
वरखेड लोंढे धरण क्षेत्रास वाळूक्षेत्र घोषित करुन याठिकाणी होणाऱ्या वाळू साठयाच्या विक्रीतून मिळणारा निधी हा जिल्ह्यातील प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यास वापरण्याबाबत तपासणी करण्याची सुचनाही मंत्री पाटील यांनी यावेळी केली. 

अन्य प्रकल्पाची देखील घेतली माहिती

बैठकीत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील वाघूर प्रकल्प, शेळगाव बॅरेज, वरखेड-लोंढे, सुलवाडे-जामफळ, महाकाय पुनर्भरण योजना, गिरणा नदीवरील ७ बंधारे, नर्मदा-तापी वळण योजना, नार-पार गिरणा वळण योजना, बोदवड परिसर उपसा सिंचन योजना, वरणगाव- तळवेल उपसा सिंचना योजना, निम्न तापी प्रकल्प, पाडळसे, ब्रिटीशकालीन फड बंधारे, भागपूर उपसा सिंचन योजना आदी प्रकल्पांवर चर्चा केली. 

हेही वाचा- महामार्गावरील मनमोहक, निसर्ग सौंदर्य प्रवास अनुभवचायं; तर जाणून घ्या, भारतातील सुंदर १० महामार्गांची माहिती !
 

 आमदारांनी केली मागणी

आमदार अनिल पाटील यांनी पाडळसे धरणासाठी येत्या अर्थसंकल्पात भरीव तरतुद करावी, पांझरा ते मांदळ नदी जोडप्रकल्पाला मान्यता मिळण्याची मागणी केली. आमदार किशोर पाटील यांनी भडगाव शहर पाणीपुरवठा योजनेस पाटबंधारे विभागाची ना हरकत मिळण्यासह गिरणा नदीवरील ७ बंधाऱ्याचे काम लवकर होण्याची मागणी केली. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: irrigation meeting marathi news jalgaon water resources minister jayant patil impetus irrigation projects work