Jalgaon Agriculture News : बळीराजाला दिलासा! जिल्‍ह्यात खतांचा पुरेसा साठा; या अधिकाऱ्यांशी साधा संपर्क | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

farmer

Jalgaon Agriculture News : बळीराजाला दिलासा! जिल्‍ह्यात खतांचा पुरेसा साठा; या अधिकाऱ्यांशी साधा संपर्क

जळगाव : रब्‍बी हंगामासाठी आवश्‍यक असलेल्‍या रासायनिक खतांचा साठा मुबलक आहे. जिल्‍ह्यात सद्यःस्थितीत एक लाख एक हजार ५४३ टन इतका खतांचा साठा असल्‍याची माहिती जिल्‍हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विकास शिंदे यांनी दिली.

जिल्‍हा परिषदेच्‍या कृषी विभागातर्फे झालेल्या पत्रकार परिषदेस जिल्‍हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, विनोद तराळ उपस्थित होते. कृषी विकास अधिकारी शिंदे यांनी खतांच्‍या उपलब्‍धतेबाबत माहिती दिली, तसेच लिकिंग किंवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार असल्‍यास तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे संपर्क साधण्याचे आवाहन केले.

हेही वाचा: Jalgaon News : आर्थिक टंचाईने त्रस्त तरुण शेतकऱ्याने मृत्यूला कवटळले

खरिपात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता रब्‍बी हंगामावर आशा आहे. रब्‍बी हंगामातील पेरा शेतकऱ्यांनी उशिरा का होईना सुरू केला आहे. अनेक शेतकरी कपाशीची फरदळ ठेवत आहेत, तर अनेकांनी गहू, हरभरा, मका, बाजरीची लागवड सुरू केली आहे. रब्बीची पेरणी, लागवड सुरू आहे.

काहींनी १५ दिवसांपूर्वीच पेरणी केली आहे, त्यासाठी खते हवी आहेत. जिल्ह्यात १०.२६.२६ ची सर्वाधिक मागणी असते. त्‍या दृष्टीने कृभको व इतर कंपन्‍यांमार्फत दोन हजार टन व इफको कंपनीमार्फत तीन हजार ७०० टन डीएपीचा पुरवठा आहे. सद्यःस्थितीला यूरियाचा ४० हजार टन, डीएपीचा चार हजार टन, पोटॅशचा तीन हजार ५०० टन साठा असल्‍याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.

हेही वाचा: Hatnur Dam : हतनूर धरणात गाळाचे साम्राज्य; क्षमतेच्या 50 टक्के गाळ

पॉज मशिन वापराचे आवाहन

खतविक्री करताना विक्रेत्‍याला पॉज मशिनद्वारे खताची नोंदणी ठेवायची आहे, यासाठी शेतकऱ्याला खत देताना पॉज मशिनवर थम्ब घेऊन खत देण्याचे आवाहन केले आहे. असे न केल्‍यास परवाना रद्द करण्याच्या कारवाईचा इशारा दिला आहे.