Jalgaon Crime : चौघुले प्लॉट भागात रात्री खुनी थरार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Crime

Jalgaon Crime : चौघुले प्लॉट भागात रात्री खुनी थरार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : चौघुले प्लॉट भागात चॉपरने एकावर हल्ला झाल्याची घटना रविवारी (ता. २०) मध्यरात्री घडली. हल्लेखोरांनी सलून व्यावसायिक सुनील टेमकर यांना दारूसाठी पैसे मागितले, पैसे देत नाही म्हणून ब्लेड दे असे म्हटल्यानंतर वाद होउन धारदार चॉपरने हल्ला चढवल्याने सुनील टेमकर (वय- ३६, रा. प्रजापतनगर) याचा खून करण्यात आला. पोलिसांनी रात्रीतून रेकॉर्डवरील तीन अल्पवयीन संशयितांना अटक केली असून त्यापैकी एक ‘माया गँग’ मधील ‘छेाटा माया’ असल्याचे सांगण्यात आले.

घटनास्थळावरुन घेतलेल्या माहितीनुसार, ममुराबाद रोडवरील जुना जकात नाक्याजवळ सुनील यांचे सलून दुकान आहे. ते गेल्या ५ दिवसांपासून आजारी असल्याने दुकान बंद होते. रविवारी धंदा बऱ्यापैकी होतो म्हणून त्यांनी दुकान उघडले होते. रात्री १० वाजेच्या सुमारास तीन तरुण दुकानावर आले, त्यापैकी एकाने सुनील यांना दारूसाठी पैसे मागितले. मात्र त्यांनी नकार दिल्याने दुसऱ्याने ब्लेड मागितले. टेमकर यांनी ब्लेड देण्यासही नकार दिल्याने वाद होऊन शिवीगाळ होत नाही तोवर तिघांपैकी एकाने कंबरेतून चॉपर काढत सुनीलवर सपासप वार केले. जखमी अवस्थेत त्याला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. उपचार सुरू होण्यापूर्वीच सुनीलचा मृत्यू ओढवला.

घटनेची माहिती मिळाल्यावर अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्यासह शनिपेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बळीराम हिरे व कर्मचाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. जखमीचा भाऊ पंकज टेमकर याने सांगितल्याप्रमाणे शनिपेठ पोलिसांनी जबाब नोंदवून खुनाचा गुन्हा दाखल केला. सुनील ५ दिवस आजारी होता, कुणाशीही वाद नाही. सलून व्यवसायात दिवसाला मिळेल ते कमावून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याच्या पश्चात आई नलीनीबाई, पत्नी योगिता, मुलगा रोनक (वय- ८), मुलगी दिप्ती असा परिवार आहे. गेल्या वर्षीच वडिलांचे निधन झाले असून दोन भाऊ आहेत. घटनेचे वृत्त कळताच जिल्हा रुग्णालयात पोचलेल्या कुटुंबीयांना रक्ताच्या थारोळ्यात सुनीलवर उपचार सुरू असतानाच हुंदके अनावर झाले. थोड्याच वेळात डॉक्टरांनी मृत घोषित केल्यावर कुटुंबीयांनी आक्रोश केला.

सुनील टेमकर यांचे सलून दुकान असलेल्या परिसरात सीसीटीव्ही असून त्यात हल्लेखोर चित्रित झाले आहे. घटनास्थळावरून माहिती घेतल्यावर अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी विविध पथकांना रवाना करून हल्लेखोर तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्यात एक छोटा माया (टोपन नाव) नामक हल्लेखोराचाही समावेश आहे.

अनेकांना त्रास; पण बोलत कोणी नाही

प्रजापतनगर, चौघुले प्लाट ते शनिपेठ परिसरात अनेकांना या अल्पवयीन माया टोळीचा प्रचंड त्रास आहे, काहीएक कारण नसताना वाद घालणे, खंडण्या उकळणे विनाकारण मारहाण लूट करुनही कोणी तक्रार देण्यास समोर येत नाही. स्थानिक गुन्हेशाखेने या टोळीला दहा महिन्यांपूर्वीच अटक केली हेाती. मात्र, अल्पवयीन असल्याने रिमांड होममधून काही दिवसातच त्यांची सुटका होऊन परत दहशतीचे वातावरण निर्माण झाले.

loading image
go to top