Jalgaon News: जळगावकरांच्या तोंडचे पाणी पळविण्याचा डाव? अमृतच्या प्रस्तावाला महासभेत बगल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Water Tap

Jalgaon News: जळगावकरांच्या तोंडचे पाणी पळविण्याचा डाव? अमृतच्या प्रस्तावाला महासभेत बगल

जळगाव : जळगावकरांना २४ तास शुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या ‘अमृत २.०’ योजनेकडे महापालिकेच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष होत आहे. या योजनेचा प्रकल्प अहवालासाठी एजन्सी नियुक्तीच्या प्रस्तावाचा विषय येत्या महासभेतही घेण्यात आलेला नाही. त्यामुळे या योजनेबाबत हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे, अशा संशय आता निर्माण होत आहे.

जळगाव शहराला २४ तास शुद्ध पाणीपुरवठा करणारी ‘अमृत २.०’ योजना जळगाव शहरासाठी मंजूर करण्यात आली आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून तब्बल १२०० कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. त्यासाठी महापालिकेने प्रकल्प अहवाल एका एजन्सीमार्फत तयार करून शासनाला पाठवायाचा आहे.

एजन्सीची नावेही शासनाने दिली आहेत. त्यातील एकाला हे काम द्यावयाचे आहे. मात्र, केवळ तेवढ्याच कामासाठी महापालिकेत घोळ घातला जात आहे. अद्यापपर्यंत महापालिकेतर्फे एजन्सी नियुक्त करण्याबाबत महासभेत मंजुरीच घेण्यात आलेली नाही. महासभेत त्याला मंजुरी घेऊन तातडीने त्या एजन्सीला काम द्यावयाचे आहे.

शासनाचेही पत्र

महापालिका ‘अमृत २.०’ योजनेचा प्रकल्प अहवाल सादर करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे शासनानेही २६ डिसेंबर २०२२ पर्यंत या योजनेचा अहवाल न सादर केल्यामुळे योजनेतून वगळल्याचे कळविले आहे.

त्यामुळे या योजनेत आताही सामाविष्ट होण्यासाठी महापालिकेला प्रकल्प अहवाल तयार करण्याबाबत महासभेत मंजुरी घेऊन एजन्सीचे नाव कळवावे लागणार आहे, तसेच त्याचा अहवालही लवकरच सादर करावा लागणार आहे. येत्या महासभेत हा प्रस्ताव घेण्यात येईल, असे सांगण्यात आले होते.

हेही वाचा: अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

१५ च्या सभेत प्रस्ताव नाही

महापालिकेची महासभा बुधवारी (ता. १५) होणार आहे. या सभेत एकूण २० विषयांवर चर्चा होणार आहे. मात्र, ‘अमृत २.०’ योजनेच्या प्रकल्प अहवाल तयार करण्याठी एजन्सी नियुक्तीबाबत कोणताही प्रस्ताव नाही. पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी या महासभेतही या प्रस्तावाला बगल दिली आहे.

योजनेबाबत आता संशय

महापालिकेचे अधिकारी व पदाधिकाऱ्यांना ‘अमृत २.०’ ही योजना जळगावात राबवायचीच नाही काय, असा प्रश्‍न आता निर्माण झाला आहे. अधिकारी व पदाधिकारीही त्याबाबत गांभीर्याने घेण्यास तयार नाही.

शासनाने या योजनेतून वगळल्याचे पत्र दिल्यानंतरही महासभेत हा प्रस्ताव ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळे जळगावकराच्या तोंडचे पाणी पळविण्याचा हा डाव आहे काय, असा प्रश्‍नही निर्माण झाला आहे. याबाबत आता अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी खुलासा करण्याची गरज आहे.

सत्ताधारी सुस्त, विरोधकही गप्प

जळगावकरांना पाणीपुरवठ्यासाठी ‘अमृत २.०’ ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतून महापालिकेला वगळण्याबाबत शासनाने पत्र दिले आहे. त्याबाबत सत्ताधारी सुस्त आहेत, तर विरोधकही गप्प बसले आहेत. त्यामुळे आता नागरिकांनीच पुढे येणे गरजेचे आहे.