Jalgaon: सव्वापाच लाख हेक्टवरील कापसावर बोंडअळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pink bollworm on cotton

जळगाव : सव्वापाच लाख हेक्टवरील कापसावर बोंडअळी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात यंदा शेतकऱ्यांना अतिवृष्टीने अगोदर मारले. आता शिल्लक कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादूर्भाव झाल्याने कपाशी उपटून फेकण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील ५ लाख ३९ हजार हेक्टरवरील कपाशीवर बोंडअळीचा प्रादूर्भाव झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली. आगामी खरीप हंगामातील कपाशीवर बोंडअळी येऊ नये, यासाठी शेतकऱ्यांना आता शेतात असलेली कपाशी उपटून फेकल्याशिवाय पर्याय नाही. यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांमध्ये बोंडअळीबाबत जनजागृती करण्यासाठी कृषी रथ गावागावांतून काढण्याचे नियोजन केले आहे.

जिल्ह्यात कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादूर्भाव दिसून आल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. बोंडअळीवर नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे, कार्यक्रम समन्वयक हेमंत बाहेती, मोहीम अधिकारी पी. एस. महाजन, जिनिंग व प्रेसिंग असोसिएशनचे अविनाश काबरा, सुशिल सोनवणे आदी उपस्थित होते. कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळीच्या निर्मूलनाबाबत बियाणे कंपन्यांनी तयार केलेल्या चित्ररथाचे जिल्हाधिकारी राउत यांच्या हस्ते अनावरण झाले.

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

जिल्ह्यात सर्वदूर झालेला पाऊस व लांबलेल्या कालावधीमुळे कापूस पिकाचा हंगाम वाढविण्याची शक्‍यता आहे. पिकाचा हंगाम वाढल्यास गुलाबी बोंडअळीसाठी अखंडित अन्नपुरवठा होत राहिल्याने या किडीचा प्रादूर्भाव वाढत जाईल, अशी चिंता व्यक्त करण्यात आली. जिल्ह्यात खरीप हंगाम २०२२ मध्ये कापूस पिकावरील बोंडअळीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी व शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी कृषी विभाग, कृषी विद्यापिठ, कृषी विज्ञान केंद्र व कापूस बियाणे कंपनींतर्फे संयुक्‍त मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत खरीप हंगाम २०२२ मध्ये बोंडअळीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी सद्यस्थितीत कापूस पिकाची फरदड घेण्यापासून शेतकऱ्यांना परावृत्त करून रब्बी हंगामात हरभरा, गहू, रब्बी ज्वारी व मका यांची पेरणी करण्याचे आवाहन करण्यात आले.

कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना हरभरा, गहू, रब्बी ज्वारी व मका बियाणे अनुदानावर दिले आहे. क्रॉपजीवन अग्रो रिसर्च अॅन्ड डेव्होलपमेंट प्रा. लि. (बेंगळुरु) शास्त्रज्ञ डॉ. पुरुषोत्तम देवांग यांच्या बोंडअळी नियंत्रणासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाची नोंद घेण्यात आली आहे. याबाबत कृषी विभाग व कृषी विद्यापीठांनी क्षेत्रीय स्तरावर प्रात्यक्षिके घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.

सद्यःस्थितीत शेतकऱ्यांनी कापूस पिकावर अनावश्यक कीटकनाशकांचा वापर न करणे व फरदड न घेता कपाशीच्या पऱ्हाट्यापासून कंपोस्ट खत तयार करावे. हेच खत टाकल्यास जमिनीची सुपिकता वाढेल.

-संभाजी ठाकूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

loading image
go to top