कॉसमॉस सल्फ्यूरीयस्
कॉसमॉस सल्फ्यूरीयस्Sakal

दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

कॉसमॉस सल्फ्यूरीयस् या आपल्याला डोळ्यांनी छान दिसणाऱ्या पण उपद्रवी परदेशी तणाचे उच्चाटन मोहीम पुण्यात राबवली जातेय.

“कॉसमॉस म्हणजे पर्यावरणाला आलेला पीतज्वर”

आज दिवसेंदिवस आपल्या परिसरातील वनराई, हरित क्षेत्र उपद्रवी फिरंगी तणांमुळे झपाट्याने कमी होत आहे आणि याचा थेट परिणाम आता त्यावर अवलंबून असलेल्या जीवसृष्टीवर व ओघाने मानवी जीवनावर सातत्याने होत आहे. त्यातच सद्य पर्यावरणीय आणीबाणीत भारत देशावर होणार्या परदेशी (आगंतुक) उपद्रवी जैविक घटकांच्या आक्रमणाची भर पडत आहे. हे फिरंगी घटक म्हणजे तण (विड), उपद्रवी मासे, कीटक व सूक्ष्मजीव. यातील सर्वात दखलपात्र व गंभीर घटक म्हणजे तण होय. लोकसहभागातून या परदेशी (आगंतुक) उपद्रवी जैविक घटकांचे आपल्या राष्ट्रातून समूळ उच्चाटन व्हावे. तसेच परकीय जैविक आक्रमणाविरोधातील चळवळ (Movement Against Biological Invasions MABI) च्या माध्यमातून तण मुक्त भारत म्हणजेच स्वच्छ भारत हा संदेश देखील जनमानसात रूढ करण्यात यावा या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

कॉसमॉस या उपद्रवी आगंतुक/परदेशी तणाचा शहरांमध्ये, रस्त्याच्या दुतर्फा, टेकड्यांवर, गवताळ कुरणांवर सध्या मोठ्या प्रमाणात पिवळ्या-केशरी फुलांचा बहर आला आहे. ही वनस्पती मूळची मेक्सिको मधली आहे, ही सूर्यफुलाच्या कुळातील वनस्पती असून तिची फुलं चटकन लक्ष वेधून घेतात. कॉसमॉसचे सौंदर्य बघून नागरिक त्यासोबत फोटो देखील काढत आहेत. त्याचं सौंदर्य जनसामान्यांना, पर्यटकांना भुरळ घालत आहे. कॉसमॉस या वनस्पतीचा वाढण्याचा वेग हा अधिक आहे. ही वनस्पती कमी पाण्यावर, अगदी ओसाड जमिनीतदेखील उत्तम तग धरू शकते. तसेच हीचा बीजप्रसार थोड्या कालावधीत सर्वदूर होतो. इतका की या वनस्पतीचाच मोठा पट्टा तयार होतो त्यामुळे भरपूर जागा या वनस्पतीने व्यापली जाते.

या उपद्रवी परदेशी वनस्पतीमुळे स्थानिक गवताच्या व अन्य वनस्पतींच्या जाती-प्रजाती मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहेत. या तणाची व्याप्ती मोठी असल्या कारणाने स्थानिक जैवसाखळीदेखील नष्ट होत आहे. अनेक कीटकांच्या जाती जसे की मधमाशी, भुंगे, फुलपाखरे आता मोठ्या प्रमाणात याचे परागकण गोळा करताना दिसतात. त्याचा देखील परिणाम स्थानिक वनस्पतींच्या परागीभवनावर होत आहे. आपल्या गुरांचे, वन्य तृणभक्षी प्राण्यांचे स्थानिक खाद्य वनस्पती या कॉसमॉस मुळे मोठ्या प्रमाणात कमी होत आहेत. गुरांना आणि मानवाला देखील या उपद्रवी वनस्पतीची एलर्जी होत आहे आणि आरोग्य विषयक प्रश्न निर्माण होत आहेत. या वनस्पतीला भरपूर फळे येतात. बीजधारणा मोठ्या प्रमाणात होते.

या बिया वाऱ्याबरोबर किंवा इतर माध्यमातून मोठ्या प्रमाणात सर्वदूर पसरतात. टायरच्या नक्षीमध्ये देखील बिया अडकून बीज प्रसार सर्वदूर होतो, प्राण्यांच्या केसाला चिटकून किंवा इतर माध्यमातून देखील ही वनस्पती इतर ठिकाणी पसरते. काही अतिउत्साही लोक या फुल झाडाच्या बिया आपल्या घराकडे, बागेमध्ये लावण्यासाठी सोबत नेतात. अनेक जणांनी कॉसमॉस चे बीज मोठ्या प्रमाणावर सीड बॉल करून फेकल्या तसेच काही गिर्यारोह्कांकडून देखील दुर्गम भागामध्ये या आगंतुक तणांच्या बियांचा फैलाव अजाणतेपणे करण्यात आला. शिवाय या वनस्पतीवर कुठलेच नैसर्गिक नियंत्रण नसल्याने ही मोठ्याप्रमाणात फोफावत आहे.

या वनस्पतीचा फैलाव रोखण्यासाठी ती उगवलेली दिसताच तिथून उपटून टाकणे हा उपाय योग्य आहे. या उपद्रवी तणांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अनेक सजग नागरिक, सेवाभावी संस्था येणाऱ्या काळात सातत्याने विविध भागात कॉसमॉस हटविण्याची मोहीम राबविणार आहोत. मूव्हमेंट अगेंस्ट बायोलॉजिकल इनव्हेजन (माबि) ही जैविक आक्रमणा-विरोधात सुरु केलेली अशीच एक हरीत चळवळ आहे.

- डॉ. सचिन पुणेकर, वनस्पतीशास्त्रज्ञ आणि पर्यावरणप्रेमी

(+91 95030 96469 )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com