Jalgaon: अतिवृष्टीच्या माराने काळवंडले पांढरे सोने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cotton

जळगाव : अतिवृष्टीच्या माराने काळवंडले पांढरे सोने

जळगाव : सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने यंदा हाती आलेला खरिपाचा हंगाम पूर्णपणे नष्ट झाला. जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या कपाशीच्या साडेपाच लाख हेक्टरपैकी चार लाख हेक्टवरील पीक प्रभावित झाले. एकूणच याचा उत्पादनावर परिणाम झाला असून, उत्पादन निम्म्याने घटले आहे. त्यामुळे पांढऱ्या सोन्याला यंदा चांगला भाव मिळाला तरी ‘हाती काही नाही’ अशी शेतकऱ्यांची स्थिती आहे.

जून, जुलैमध्ये पाऊस झाला नाही. दुबार पेरणीचेही नुकसान झाले. त्यातच जुलै, ऑगस्टमध्ये पाठ फिरवलेल्या पावसाने सप्टेंबरमध्ये कहर केला. या महिन्यात तीन-चार वेळा अतिवृष्टीचा मार पडला. जेवढे उत्पादन हाती येणार होते, ते येण्याची आशा धुसर झाली. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यातही कमी-अधिक प्रमाणात पाऊस बरसला.

हेही वाचा: पेट्रोल-डिझेल वर चालणाऱ्या गाड्यांचे उत्पादन बंद करणार 'या' कंपन्या

कपाशीचे मोठे क्षेत्र

जळगाव जिल्ह्यात केळीसोबतच कापूस हे प्रमुख पीक. त्याखालोखाल मका, सोयाबीन, ज्वारी, उडीद, तूर आदी पिकांची स्थिती. खरिपात कापूस, मका, तूर, उडीद हीच प्रमुख पिके. कापसाचे क्षेत्र तुलनेत अधिक. यंदा जिल्ह्यात पाच लाख ३७ हजार ३३७ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली होती. दर वर्षी कमी-अधिक प्रमाणात साधारणत: पाच लाखांच्या जवळपास कपाशीचे लागवड क्षेत्र असते.

कापसालाच मोठा फटका

पावसाच्या सरासरी बरसण्यावर व शेताच्या स्थितीवरून सर्वसाधारणपणे हेक्टरी पाच ते सात क्विंटल उत्पादन येत असते. यंदा मात्र सप्टेंबरमधील अतिवृष्टीने कपाशीसह सर्वच पिकांचे अतोनात नुकसान केले. हेक्टरी पाच क्विंटलचे उत्पादन यंदा घटून दोन ते तीन क्विंटलपर्यंत मर्यादित झाले आहे. अद्याप एकूण उत्पन्न किती आले, याचा आकडा हाती आलेला नाही. तरीही दहा लाख क्विंटलपेक्षा जास्त उत्पन्न नसावे, असा अंदाज बांधला जात आहे. डिसेंबरमध्ये याबाबतचा अधिकृत आकडा मिळू शकेल. इतर मका, सोयाबीन, दादर, उडीद, तूर, मुगाच्या पिकांची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही.

हेही वाचा: चाकूने १०० वार, डोळे काढून खेळला गोट्या!

शेतच्या शेत झाले नष्ट

सप्टेंबरमध्ये जिल्ह्यातील बहुतांश भागात जो पाऊस झाला, तो अतिवृष्टीच्या स्वरूपात झाला. चाळीसगाव परिसरात तर ढगफुटीसदृश पाऊस दोन-तीनदा झाला. त्यामुळे या महिन्यात जिल्ह्यातील नद्यांना तीन-चार वेळा पूरही आला. नोव्हेंबरमध्येही गिरणासारखी नदी वाहती दिसतेय, हे पहिल्यांदाच घडले इतका पाऊस होता. मात्र या पावसाने शेतच्या शेतं नष्ट झाली... ती तयार व्हायला दीर्घकाळ लागेल. तुलनेने शेतकऱ्यांना मिळणारी मदत मात्र अगदीच तुटपुंजी आहे.

loading image
go to top