Jalgaon Crime : चोरीच्या पैशातून जंगी पार्टी करताना भामटा ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Jalgaon Crime : चोरीच्या पैशातून जंगी पार्टी करताना भामटा ताब्यात

जळगाव : बच्चागँगला सोबत घेत अट्टल गुन्हेगाराने सराफ बाजारातील मनीष ज्वेलर्स हे सराफा दुकान फोडून सोने- चांदीचे दागिने आणि रोकड चोरून नेणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला गुन्हेशाखेने अटक केली आहे. विशाल ऊर्फ ॲस्‍टीन युवराज सोनवणे (वय २७) असे अटकेतील मास्टरामाईंडचे नाव आहे.

शहरातील सराफ बाजारातील मनीष ज्वेलर्स या ललित शर्मा यांच्या मालकीच्या शोरूमची रेकी करून चोरट्यांनी ७ नोहेंबरच्या मध्यरात्री दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला. आतील सोन्या- चांदीच्या दागिन्यांसह रोकड चोरट्यांनी लंपास केली होती. जिल्‍हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी स्वतः या प्रकरणाकडे लक्ष पुरवून तपासाची धुरा हाती घेत गुन्हेशाखेला सूचना केल्या होत्या. निरीक्षक किशनराव नजन पाटील यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताचा शोध सुरू केला.

माहितीद्वारे कारवाई

मिळालेल्या माहितीवरून पथकातील विजय पाटील यांनी भिलवाडी (ता. जळगाव) येथील विशाल ऊर्फ ॲस्टीन युवराज सोनवणे (वय २७, रा. पावर हाऊस) याला ताब्यात घेतले. दोन दिवस सलग चौकशी केल्यानंतर संशयिताने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या बच्चा गँगमधील पाच संशयितांना ताब्यात घेत गुन्ह्यातील चोरीचा माल पथकाने हस्तगत केला आहे.

हेही वाचा: Crime : बालपणाचे मित्र बनले पक्के वैरी; मित्रांकडूनच खुनाचा जळगाव पॅटर्न

ॲस्टीनला अशी झाली अटक

गुन्हेशाखेच्या पथकाने मनीष ज्वेलर्स दुकान फोडणाऱ्या संशयितांचे सीसीटीव्ही फुटेज संकलित केले. त्यात गल्लीच्या तोंडावर पाळतीवर उभा असलेला जर्कीन घातलेला विशाल ऊर्फ ॲस्टीन याचा चेहरा सीसीटीव्हीत कैद झाला, तर दुसऱ्या एका कॅमेऱ्यातील फुटेजमध्ये हेच जर्कीन घातलेला भामटा एका पायाने लंगडत असल्याचे आढळले. विजय पाटील यांनी खबऱ्यास वर्णन सांगताना चोरट्याचा उजवा पाय लंगडत असल्याचे कळविताच त्याने दारू अड्ड्याचा पत्ताच सांगितला. तेथे विशाल ऊर्फ ॲस्टीन दारूच्या नशेत आढळून आला.

दोन दिवस पाहुणचार

गुन्हे शाखेने विशाल ऊर्फ ॲस्टीनला ताब्यात घेतले तेव्हा तो दारूच्या नशेत काही बोलण्याच्या अवस्थेत नसल्याने त्याला सलग दोन दिवस खातरपाणी करण्यात आली. तो पूर्ण शुद्धीवर आल्यानंतर पोलिस प्रसाद मिळताच त्याने गुन्ह्याची कबुली देत आपल्या बच्चा गँगची माहिती सांगितली. अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर या टोळीने चोरीचा काही माल पोलिसांना काढून दिला आहे. या टोळीकडून इतरही घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हेही वाचा: जळगाव : व्याजाच्या पैशांसाठी विवाहितेसह वडीलांना बेदम मारहाण

टॅग्स :crime