
जळगाव : 'नाचताना धक्का' लागल्या कारणातून तरुणाचा खून
तळोदा : लग्नात नाचताना धक्का लागण्याच्या किरकोळ कारणावरून चार जणांनी तरुणास बेदम मारहाण केली. त्यात तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे सोबत नाचणाऱ्या चार जणांविरोधात तळोदा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी शहरातील एका लग्नाच्या ठिकाणी संदीप सुनील पाडवी (वय १८, राहणार कोहली हट्टी) हा नाचत होता. नाचताना त्याचा धक्का लव सोना पाडवी, कुश सोना पाडवी, सूरज रवींद्र पाडवी, रोहित रवी पाडवी (सर्व रा. पाडवी गल्ली) यांना लागला. चारही जणांनी संदीप पाडवी यास बेदम मारहाण केली.
त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान संदीपचा मृत्यू झाला. सुनील विजयसिंग पाडवी (रा. कोहली हट्टी) यांच्या फिर्यादीवरून चारही संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी संभाजी सावंत व पोलिस निरीक्षक केलसिंग पावरा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. नंदुरबार येथून फॉरेन्सिक लॅब पथकही मागविण्यात आले होते. या पथकानेही घटनास्थळाची पाहणी केली. सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश केदार तपास करीत आहेत.