Jalgaon: पीक उत्पादन घेताना पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे : डॉ. वने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Water-Management

पीक उत्पादन घेताना पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे : डॉ. वने

जळगाव : हरभरा, कांदा पीक उत्पादन घेताना पाणी व्यवस्थापन महत्त्वाचे असल्याचे मार्गदर्शन प्रगतिशील शेतकरी कृषिभूषण, डॉ. दत्तात्रय वने (मानोरी, ता. राहुरी, जि. अहमदनगर) यांनी मंगळवारी )ता. २३) येथे केले.

कृषी विभाग जळगाव, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीअंतर्गत कृषी विज्ञान केंद्र (ममुराबाद) फार्म जळगाव व कृषी विज्ञान केंद्र (पाल) यांच्यातर्फे ऑनलाइन रब्बी पूर्व हंगामी हरभरा व कांदा तंत्रज्ञान कार्यशाळा ग्रामीण युवक व शेतकऱ्यांसाठी झाली. त्यात ते बोलत होते. हरभरा व कांदा पिकासाठी तुषार सिंचन पद्धत कशा पद्धतीने वापरायची व पाणी व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचे ? या दोन्ही पिकात काम करताना त्यांनी केलेले विविध प्रयोग या संदर्भात मार्गदर्शन केले. पीक उत्पादन घेताना काटेकोर शेती कशा पद्धतीने करायची याबाबत श्री. वने यांनी मार्गदर्शन केले.

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

जिल्हाधिकारी अभिजित राउत, संचालक कृषी विस्तार विकास पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कडधान्य पैदासकार डॉ. एन. एस. कुटे (राहुरी), कृषी उपसंचालक अनिल भोकरे, वरिष्ठ शास्रज्ञ व प्रमुख डॉ. हेमंत बाहेती, विभागीय बीज प्रमाणीकरण अधिकारी हितेंद्र सोनवणे, कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद फार्मचे विषय विशेषज्ञ वैभव सूर्यवंशी, विषय विशेषज्ञ अतुल पाटील यांनी मार्गदर्शन केले.

श्री. राउत म्हणाले की, येणारा रब्बी हंगाम आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. या कार्यशाळेनिमित्त कृषी विषयक तांत्रिक गोष्टी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आपल्याला पोचवायच्या आहे. या कार्यशाळेद्वारे कृषिविषयक उत्पादनाचे मूल्यवर्धन याविषयी मार्गदर्शन होईल. संजय पवार यांनी सूत्रसंचालन केले.

निसर्गातील बदलानुसार शेती करणे गरजेचे

श्री. ठाकूर म्हणाले, या बदलत्या हवामानात जर आपल्याला शेती करायची असेल तर निसर्गातील बदलानुसार शेती करणे गरजेचे आहे. सद्य:स्थितीत बोंड अळी नियंत्रणासाठी कापूस काढून हरभरा पीक घ्यावे व पिकाची फेर पालट करावी. संचालक पाटील म्हणाले, की योग्य वेळेला आयोजित कार्यशाळेद्वारे शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी चांगले उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. रब्बी हंगामात पीक घेताना पाणी, खत याचे योग्य व्यवस्थापन कसे करावे या संदर्भात कार्यशाळेद्वारे मार्गदर्शन होईल. श्री. भोकरे यांनी शाश्वत शेती उत्पादनासाठी पाणी व्यवस्थापन, पीक पेरणी, लागवड अंतर, कीड नियंत्रण, पिकाची फेरपालट आणि शेतीचे शास्र समजून घेताना उत्पादनाचे गणित समजून घेणे गरजेचे आहे, याबद्दल मार्गदर्शन केले.

loading image
go to top