जळगाव जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीचे ‘सहकार’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जळगाव जिल्हा बँक
जळगाव जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीचे ‘सहकार’

जळगाव जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीचे ‘सहकार’

जळगाव : जळगाव जिल्हा बँक संचालकपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीप्रणीत ‘सहकार पॅनल’ने आपले वर्चस्व सिद्ध करत २१ पैकी २० जागांवर विजय मिळविला. रावेरमध्ये जाहीर माघार घेणाऱ्या सहकार पॅनलच्या जनाबाई महाजन यांनी एका मताने विजय मिळविला. ओबीसी गटातून डॉ. सतीश पाटील, इतर संस्थांमधून गुलाबराव देवकर, तर महिला गटातून ॲड. रोहिणी खडसे व शैलजा निकम यांनी विजय मिळाविला.

जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक निवडणुकीत रविवारी (ता. २१) झालेल्या मतदानाची सोमवारी (ता. २२) मतमोजणी झाली. चोपडा विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून सहकार गटाचे घनश्‍याम अग्रवाल विजयी झाले. त्यांना ६४ पैकी ६३ मते मिळाली, तर एक मत बाद झाले. विरोधकांना एकही मत मिळाले नाही. यावल विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघात ‘सहकार’चे विनोद पाटील विजयी झाले. त्यांना ४७ पैकी २५, तर विरोधी गणेश नेहते यांना २२ मते मिळाली.

रावेर विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघात काँग्रेसच्या सहकार गटाच्या उमेदवार जनाबाई महाजन यांनी जाहीर माघार घेत अपक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण पाटील यांना पाठिंबा दिला होता. प्रत्यक्ष मतदानात मात्र त्या एका मताने त्या विजयी झाल्या. त्यांना २६ मते मिळाली, तर पाटील यांना २५ मते मिळाली.

आमदार सावकारेंची बाजी

भारतीय जनता पक्षाने निवडणुकीवर बहिष्कार टाकत माघार घेतली असली, तरी भुसावळचे आमदार संजय सावकारे यांचा अर्ज मात्र कायम होता. भुसावळ विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून त्यांनी बाजी मारली. त्यांना २६ पैकी २२ मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी शांताराम धनगर यांना केवळ चार मते मिळाली. विरोधी गटात विजयी झालेले ते एकमेव उमेदवार आहेत.

डॉ. पाटील, देवकर, नाईकांचे यश

सहकार पॅनलचे ओबीसी मतदारसंघातील उमेदवार माजी मंत्री डॉ. सतीश पाटील विजयी झाले. त्यांना दोन हजार ३१६ मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी विकास पवार यांना २४२ मते मिळाली. इतर संस्था मतदारसंघातून सहकार गटाचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर विजयी झाले. त्यांना एक हजार ६०१ मते मिळाली. त्यांचे विरोधक रवींद्र पाटील यांना १८१ मते मिळाली. विशेष मागास प्रवर्ग गटात सहकार पॅनलचे मेहताबसिंग नाईक विजयी झाले. त्यांना दोन हजार ३२६, तर प्रतिस्पर्धी विकास वाघ यांना २८० मते मिळाली. अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून सहकार पॅनलचे श्‍यामकांत सोनवणे विजयी झाले. त्यांना दोन हजार ४६४ मते मिळाली.

महिला राखीवमध्ये खडसे, निकम विजयी

महिला राखीव मतदारसंघातही सहकार पॅनलने यश मिळविले. विद्यमान अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे व शैलजादेवी निकम विजयी झाल्या. ॲड. खडसे यांना दोन हजार २३५ मते मिळाली. तर श्रीमती निकम यांना एक हजार ९२५ मते मिळाली. विरोधी सहकार गटाच्या अरुणा पाटील यांना ५२४ मते मिळाली.

अध्यक्षपदासाठी देवकर निश्‍चित

जळगाव : जळगाव जिल्हा बँक निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने सर्वाधिक जागा मिळविल्याने अध्यक्षपदासाठी गुलाबराव देवकर यांचे नाव निश्‍चित मानले जात आहे. मात्र, त्याचवेळी डॉ. सतीश पाटील यांना संधी मिळण्याची शक्यताही व्यक्त होत असून, एकनाथ खडसे यांनी निवडणूकीत यश मिळविण्यासाठी दाखविलेल्या चाणक्यनितीमुळे ॲड. रोहिणी खडसे यांची पुन्हा वर्णी लागण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वरिष्ठांतर्फे श्री. देवकर यांचे नाव सूचविण्यात आले असल्याचे सांगण्यात येते. देवकर यांनी पक्षाच्या आदेशाप्रमाणे लोकसभा निवडणूक लढविली, मात्र त्यांना अपयश आले. त्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणूक लढविली नाही. मात्र, जिल्हा बँक निवडणूकीत पॅनलचे नेतृत्व केले. त्यामुळे त्यांना संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. त्याचवेळी पारोळ्याचे माजी आमदार डॉ. पाटील यांनाही संधी मिळणार दिली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पक्षाच्या ऐन पडत्या काळात त्यांनी पक्षाला सावरले. भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्यावर त्यांनी थेट टिका केली होती. त्यामुळे त्यांचेही नाव चर्चेत आहे. तर, राष्ट्रवादी कॉंग्रसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील आणि संचालकपदाची हॅट्‌ट्रीक करणारे संजय पवार यांची नावेही चर्चेत आहेत.

दरम्यान, अशा पार्श्‍वभूमीवर अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा कालावधी ठरण्याची शक्यताही व्यक्त होत असून, प्रत्येकी अडीच वर्षासाठी हे पद निश्‍चित केले जाऊ शकते. याबाबत मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते श्री. खडसे यांचा निर्णय अंतीम राहणार आहे. त्यामुळे खडसे काय निर्णय घेतात याकडेच लक्ष असणार आहे.

उपाध्यक्षपदासाठी अमोल पाटील

महाविकास आघाडीनिर्मित सहकार पॅनलमध्ये संख्याबळात शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे त्यांच्याकडे उपाध्यक्षपद जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेतर्फे ज्येष्ठ असलेले आमदार चिमणराव पाटील नवव्यांदा निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांना संधी मिळण्याचीही शक्यता आहे. परंतु, त्यांनी यापूर्वी अध्यक्षपद भूषविलेले असल्याने ते उपाध्यक्षपद घेणार नाहीत, असे मानले जाते. अशावेळी दुसऱ्यांदा बिनविरोध निवडून आलेले त्यांचे पूत्र अमोल पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याशिवाय आमदार किशोर पाटील यांनी हे पद भूषविले आहे. तसेच, इतर सदस्य पहिल्यांदा निवडून आले आहेत. मात्र ज्येष्ठ नेते असलेले प्रताप हरी पाटील यांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे. आता फक्त पहिल्या कि दुसऱ्या टर्ममध्ये संधी मिळणार याबाबत आघाडीचे नेतेच ठरविणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस क्रमांक एकवर

महाविकास आघाडीच्या सहकार गटात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस असे तीन पक्ष आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक जागा मिळविल्या आहेत. शिवसेना क्रमांक दोनवर, तर काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे. पक्षनिहाय बलाबल असे : विविध कार्यकारी सोसायटी : मुक्ताईनगर- एकनाथ खडसे (राष्ट्रवादी), चाळीसगाव- प्रदीप रामराव देशमुख (राष्ट्रवादी), धरणगाव- संजय मुरलीधर पवार (राष्ट्रवादी), बोदवड- रवींद्र प्रल्हाद पाटील (राष्ट्रवादी), जामनेर- नाना राजमल पाटील (राष्ट्रवादी), अमळनेर- अनिल भाईदास पाटील (राष्ट्रवादी), चोपडा- घनश्‍याम अग्रवाल (राष्ट्रवादी), जळगाव- जयश्री सुनील महाजन (शिवसेना), पाचोरा- किशोर धनसिंग पाटील (शिवसेना), पारोळा- चिमणराव रूपचंद पाटील (शिवसेना), एरंडोल- अमोल चिमणराव पाटील (शिवसेना), भडगाव- प्रताप हरी पाटील (शिवसेना), रावेर- जनाबाई गोंडू महाजन (काँग्रेस), यावल- विनोद पंडितराव पाटील (काँग्रेस), भुसावळ- संजय वामन सावकारे (अपक्ष), ओबीसी मतदारसंघ- डॉ. सतीश पाटील (राष्ट्रवादी), इतर संस्था मतदारसंघ- गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी), विशेष मागास प्रवर्ग- मेहताबसिंग नाईक (राष्ट्रवादी), अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघ- श्‍यामकांत सोनवणे (शिवसेना), महिला राखीव- ॲड. रोहिणी खडसे (राष्ट्रवादी), शैलजादेवी निकम (काँग्रेस).

काँग्रेसची ताकद वाढली : पवार

जळगाव : जळगाव जिल्हा बँकेत गेल्या वेळी कॉंग्रेसचे एकच संचालक होते. आता तीन संचालक निवडून आले आहेत. त्यामुळे कॉंग्रेसची ताकद वाढली आहे. असा दावा कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी पत्रकार परिषदेत केला. निवडणूकीच्या निकालानंतर कॉंग्रेस भवन येथे जल्लोष करण्यात आला. आमदार शिरीष चौधरी, शहराध्यक्ष शाम तायडे, जिल्हा परिषदेचे गटनेते प्रभाकर सोनवणे, बँकेचे नवनिर्वाचित संचालक विनोद पाटील, शैलजा निकम, जनाबाई महाजन आदी उपस्थित होते. श्री. पवार म्हणाले की, पक्षातर्फे आम्ही चार जागांची मागणी केली होती. मात्र, चोपड्याची जागा लढवता आली नाही. परंतु, तीनही जागांवर विजय संपादन केला आहे. हा काँग्रेसच्या एकजुटीचा विजय आहे.

गनिमी काव्याने मिळाला विजय : महाजन

रावेर येथील विजयाबाबत, विजयी उमेदवार जनाबाई महाजन यांचे पती गोंडू महाजन म्हणाले कि, हा विजय आम्ही गनीमी कावा लढून मिळविला आहे. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राजीव पाटील यांनी पक्षाचा विश्‍वासघात केल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.

loading image
go to top