जळगाव जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत सक्रिय रुग्ण दहाच्या आत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona

जळगाव जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत सक्रिय रुग्ण दहाच्या आत


जळगाव : जिल्ह्यातील कोरोना (corona) संसर्गाच्या नियंत्रणात मंगळवारी (ता. १३) महत्त्वाचा टप्पा गाठला गेला. नऊ तालुक्यांमधील सक्रिय रुग्णांची (Active corona patient) संख्या आता दहाच्या आत असून, दिवसभरात अवघे सहा बाधित रुग्ण (corona patient) आढळून आले, तर २६ रुग्णांनी कोरोनावर (corona free patient) मात केली. (jalgaon district nine taluka active corona patient low)

जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्गावरील नियंत्रणात मोठा टप्पा गाठला गेला आहे. लॉकडाउन, त्यानंतरच्या अनलॉकच्या प्रक्रियेतील निर्बंधांमुळे संसर्ग आटोक्यात येत आहे. बरे होणाऱ्यांची संख्या नव्या बाधितांपेक्षा वाढतीच असल्याने सक्रिय रुग्ण आता अडीचशेच्याही खाली आले आहेत, तर १५ पैकी नऊ तालुक्यांमध्ये सक्रिय रुग्णसंख्या अवघी एकअंकी म्हणजे दहाच्या आत राहिली आहे. केवळ जळगाव शहर, भुसावळ, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, जामनेर या तालुक्यांत सक्रिय रुग्ण दहापेक्षा अधिक आहेत.

नव्या रुग्णांचा नीचांक
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत कोरोनाच्या नव्या बाधितांची सर्वांत कमी म्हणजे अवघे सहा एवढी संख्या मंगळवारी नोंदली गेली. त्यात भुसावळ- एक, अमळनेर- दोन, जामनेर- एक, चाळीसगाव- एक असे रुग्ण आढळून आले. जळगाव शहरासह अन्य ११ तालुक्यांत एकही रुग्णाची नोंद झाली नाही. एकूण रुग्णसंख्या एक लाख ४२ हजार ४७५ झाली आहे, तर २६ रुग्ण बरे झाले. बरे होणाऱ्यांचा आकडा एक लाख ३९ हजार ६६४ वर पोचला आहे. मंगळवारी सलग चौथ्या दिवशी एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. सक्रिय रुग्णसंख्या २३७ पर्यंत खाली आली आहे.

जळगावात रुग्ण नाही
पहिल्या व दुसऱ्या लाटेतही हॉटस्पॉट ठरलेल्या जळगाव शहरात मंगळवारी एकही रुग्ण आढळून आला नाही. सक्रिय रुग्णांची संख्याही शहरात आता चाळीसपर्यंत मर्यादित राहिली आहे.

टॅग्स :jalgaon news