पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याला झळाळी; ३ हजार ७०० रुपयांची वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gold

चार दिवसांवर येऊन ठेपलेला साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेला गुढीपाडव्याचा सण येत्या बुधवारी (ता. २२) आहे.

Jalgaon News : पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याला झळाळी; ३ हजार ७०० रुपयांची वाढ

जळगाव - चार दिवसांवर येऊन ठेपलेला साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेला गुढीपाडव्याचा सण येत्या बुधवारी (ता. २२) आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सोन्याच्या दरात प्रतितोळा ३ हजार ७००, तर चांदीच्या दरात प्रतिकिलो सहा हजारांची वाढ झाली आहे. दहा ते अठरा मार्च या अवघ्या आठ दिवसांतील ही वाढ आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पानंतर सोन्यात ८०० रुपयांची, तर चांदीच्या दरात तीन हजारांची वाढ झाली होती. नंतर मात्र सोन्यात १५००, तर चांदीत ४ हजारांनी घसरण झाली. दहा दिवसांपूर्वी सोने ५५ हजार ६०० (प्रति तोळा), तर चांदी ६३ हजारांवर (प्रती किलो) पोचले होते. आज सोन्याचा दर प्रती तोळे ५९ हजार ३०० (विना जीएसटी), तर चांदीचा दर ६९ हजारांवर पोचला आहे.

गुढीपाडवा नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून महिला आवर्जून सोने खरेदी करतात. या दिवशी सुवर्ण बाजारपेठेत मोठी गजबज असते. संभाव्य वाढती मागणी, आंतरराष्ट्रीयस्तरावरील घडामोडींमुळे सोन्याचे भाव वाढलेले असल्याची माहिती सुवर्ण व्यावसायिकांनी दिली. केंद्रीय अंदाजपत्रकानंतर दुसऱ्याच दिवशी सोने, चांदीच्या दरात वाढ होऊन, सोन्याने उसळी घेतली होती. महिन्यानंतर मात्र सोन्यात १५००, तर चांदीत ४ हजारांनी घसरण झाली. बजेटनंतर सोने, चांदीचे दर वाढतच जातील असे चित्र होते. प्रत्यक्षात मात्र दहा दिवसानंतरही सोन्याचे दर तसेच राहिले होते. चांदीच्या दरात मात्र तब्बल पाच हजारांची घसरण झाली होती.

ग्रामीण भागात सर्वाधिक खप

नवीन वर्षात सोने, चांदी बाजारात तेजीचे वातावरण आहे. जानेवारीत सोन्याच्या दरात पंधराशे रुपयांची, तर चांदीच्या दरात एक हजारांची वाढ झाली होती. तेव्हा सोन्याचा दर जीएसटीसह प्रतितोळा ५८ हजार ८०० वर, तर चांदीचा दर जीएसटीसह प्रतिकिलो ७२ हजार १०० वर पोचला होता. शहरासह ग्रामीण भागातील महिलांचा कल सोने खरेदीकडे वाढत आहे. शहरी भागातील महिलाही गुंतवणूक आणि फॅशन म्हणून सोन्याकडे पाहतात. भारतातील एकूण सोन्याची वार्षिक मागणी ११०० ते १२०० टन एवढी आहे. त्यापैकी ५५ ते ६० टक्के खप हा ग्रामीण भागात होतो.