Jalgaon Lok Sabha Constituency : शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी पवार गटाची भूमिका निर्णायक

Jalgaon News : जळगाव लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रांमधील पक्षीय वर्चस्व पाहता महायुतीतील भाजपच्या उमेदवारासाठी शिवसेना शिंदे गटाची भूमिका जशी महत्त्वाची ठरणार आहे.
Jalgaon Lok Sabha Constituency
Jalgaon Lok Sabha Constituency esakal

Jalgaon News : जळगाव लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रांमधील पक्षीय वर्चस्व पाहता महायुतीतील भाजपच्या उमेदवारासाठी शिवसेना शिंदे गटाची भूमिका जशी महत्त्वाची ठरणार आहे, तशी महाविकास आघाडीतील शिवसेना ‘उबाठा’च्या उमेदवारासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. (Jalgaon Lok Sabha Constituency)

त्यामुळे मित्रपक्षांच्या सहकार्याशिवाय दोन्ही उमेदवारांना ही निवडणूक सोपी नाही, हेच दिसून येते. जळगाव लोकसभा मतदारसंघात अनेक वर्षांपासून अपवाद वगळता भाजपचे वर्चस्व राहिले आहे. असे असले तरी या मतदारसंघात समावेश होणाऱ्या विधानसभा मतदारसंघांचा विचार केला तर सहापैकी जवळपास चार- पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे प्राबल्य दिसून येते. जळगाव लोकसभेत जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, अमळनेर.

एरंडोल- पारोळा, पाचोरा- भडगाव व चाळीसगाव असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. यात जळगाव शहरात भाजपचे आमदार सुरेश उर्फ राजूमामा भोळे, ग्रामीणमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील, अमळनेरला राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे अनिल भाईदास पाटील (मंत्री), एरंडोल-पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील हे शिंदे गटाचे, पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील हेदेखील शिंदे गटाचे तर चाळीसगावला भाजपचे आमदार मंगेश चव्हाण आहेत.

सेना- राष्ट्रवादी प्रबळ

या सहा विधानसभा क्षेत्रांपैकी भाजपच्या ताब्यात केवळ जळगाव शहर व चाळीसगाव हे दोनच मतदारसंघ आहेत. ज्या वेळी शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पडली नव्हती, तेव्हा या संपूर्ण जळगाव लोकसभा मतदारसंघात सेना- राष्ट्रवादीचे प्राबल्य होते, तेच दिसून येते. जळगाव शहरात भाजपचे आमदार असले तरी मनपात शिवसेनेचे ‘उबाठा’चे वर्चस्व आहे. (Jalgaon Political News)

ग्रामीणमध्ये पालकमंत्र्यांच्या माध्यमातून शिंदे गट प्रबळ दिसतो. अमळनेरला मंत्री अनिल पाटलांमुळे अजित पवार गटाचे वर्चस्व पाहायला मिळते. एरंडोल- पारोळ्यात शिंदे गटासोबतच ‘उबाठा’ व राष्ट्रवादी शरद पवार गटाचेही वर्चस्व आहे. कारण माजी मंत्री डॉ. सतीश पाटील हेदेखील या मतदारसंघातून दोनदा आमदार राहिले आहेत.

पाचोऱ्यात किशोर पाटील हे शिंदे गटाचे आमदार असले त्यांचे प्रतिस्पर्धी माजी आमदार दिलीप वाघ यांच्यासह त्यांच्या वडिलांनी (स्व. ओंकार आप्पा वाघ) यांनीही या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. चाळीसगावला भाजपचे आमदार मंगेश चव्हाण असले तरी या मतदारसंघात त्यांच्या आधी आता ‘उबाठा’त असलेले उन्मेश पाटील आमदार होते. त्याआधी राष्ट्रवादीच्या राजीव देशमुखांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले आहे.

भाजपही तुल्यबळ

ही राजकीय स्थिती संपूर्ण जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वर्चस्व दर्शवते. त्यामुळे राष्ट्रवादीतील दोन्ही गट अथवा शिवसेनेच्या दोन्ही गटांचे प्राबल्य असलेला हा पश्‍चिम जळगाव जिल्ह्याचा भाग आहे.

शिवसेना- राष्ट्रवादीतील दोन्ही गटांच्या वर्चस्वात या मतदारसंघात भाजपने लोकसभा क्षेत्र व त्या- त्या तालुक्यांत आपले अढळ स्थान संघटनेच्या बळावर निर्माण केले आहे. सहापैकी केवळ दोनच ठिकाणी भाजपचे आमदार असले तरी प्रत्येक विधानसभा क्षेत्रात भाजपचे स्वतंत्र कार्यकर्ता बळ आहे. जळगाव शहर व चाळीसगावसह जळगाव ग्रामीणमध्ये, अमळनेर, एरंडोल, पारोळा, पाचोरा, अशा सर्वच तालुक्यांत भाजपचे तुल्यबळ वर्चस्व राहिले आहे.

मित्रपक्षांवर मदार

जळगाव लोकसभेतील जवळपास तीन विधानसभा मतदारसंघात याआधी झालेल्या लढतींमध्ये प्रामुख्याने शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस हेच प्रतिस्पर्धी म्हणून लढले आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांची ताकद सारखीच म्हणायला हवी. या लोकसभा निवडणुकीत म्हणूनच भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ असोत की, ‘उबाठा’चे करण पवार; या दोन्ही उमेदवारांना मित्रपक्षांच्याच सहकार्यावर अवलंबून राहावे लागणार आहे.

भाजपसाठी शिंदे गटाचे आमदार मंत्री गुलाबराव पाटील, किशोर पाटील, चिमणराव पाटील यांच्यासह अनिल भाईदास पाटील यांची तसेच ‘उबाठा’च्या करण पवारांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर, दिलीप वाघ, राजीव देशमुख यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com