Jalgaon Lok Sabha Election : ‘व्हीजनरी’ प्रमोद महाजनांची ‘ती’ भविष्यवाणी अन्‌ केंद्रात भाजपचे सरकार

Jalgaon News : सन २००४ ची लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक.. पंतप्रधान म्हणून अटलजींची प्रतिमा जनमानसात बऱ्यापैकी लोकप्रिय ठरलेली..
Eknath Khadse,  Pramod Mahajan
Eknath Khadse, Pramod Mahajan esakal

Jalgaon News : सन २००४ ची लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक.. पंतप्रधान म्हणून अटलजींची प्रतिमा जनमानसात बऱ्यापैकी लोकप्रिय ठरलेली.. त्याआधारे भाजपने ‘शायनिंग इंडिया’चे ब्रॅन्डिंग सुरु केले.. प्रमोद महाजन खानदेशच्या दौऱ्यावर आले. नंदूरबार, धुळे करत ते जळगावी दाखल झाले. तेव्हा भाजपत असलेले एकनाथ खडसे व महाजनांमध्ये नंदुरबारच्या जागेवरुन दावे- प्रतिदावे सुरु होते. (Jalgaon Lok Sabha Election)

‘वातावरण चांगले आहे, यावेळी नंदुरबारची जागा येतेय’ असा खडसेंचा दावा. महाजन मात्र, ‘नाही या वेळीही नाही..’ असे सांगत होते. दोघांमध्ये पैज लागली.. पैज लावता लावता महाजन म्हणाले.. ‘नाथाभाऊ, ज्यावेळी नंदुरबारची जागा येईल, तेव्हा केंद्रात आपले पूर्ण बहुमताचे सरकार असेल..’ महाजनांचे व्हीजन, राजकीय विश्‍लेषण किती परफेक्ट होते, याचा प्रत्यय नंतर २०१४ ला आला. दुर्दैवाने प्रमोद महाजन हा स्वर्णक्षण अनुभवण्यासाठी हयात नव्हते.

महाराष्ट्रातील राजकारणाचा दिल्लीतील चेहरा म्हणून प्रमोद महाजनांची ओळख होती. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांवर त्यांचे प्रभुत्व. उत्कृष्ट वक्ते, हजरजबाबी असे त्यांचे व्यक्तिमत्व. भाजप- शिवसेना युतीचे आणि केंद्रात अटलजींच्या मागे सर्व पक्षांची ताकद लावून ‘राष्ट्रीय लोकशाही आघाडी़’चेही ते शिल्पकार. भाजपत आता अमित शहांना चाणक्य मानले जात असेल तर त्या वेळचे कौटिल्य होते प्रमोद महाजन.

त्यांचे राजकीय विश्‍लेषण सहसा चुकत नसे. व्हीजनरी नेता म्हणून त्यांचा देशभरात लौकिक होता. २००४ चा तो काळ. अटलजींच्या नेतृत्वाखालील गैरकॉंग्रेसी सरकारने प्रथमच पाच वर्षांची कारकीर्द पूर्ण केलेली.. पुन्हा भाजपच्या नेतृत्वाखालील ‘एनडीए’चे सरकार येईल, अशी स्थिती.. प्रमोद महाजनांनाच प्रचार प्रमुख म्हणून भाजपने जबाबदारी सोपवलेली.

‘शायनिंग इंडिया’चा नारा देत महाजन देशव्यापी दौऱ्यावर निघालेले. आता नरेंद्र मोदी जसा देश पालथा घालतात, तशी जबाबदारी त्यावेळी प्रमोद महाजनांकडे होती. खानदेश, उत्तर महाराष्ट्रावर त्यांचे विशेष प्रेम. पक्षाच्या ‘शत प्रतिशत भाजप’ संकल्पनेला ‘शत प्रतिशत’ पूर्ण करणारा जिल्हा म्हणून जळगावचा लौकिक होता. (jalgaon political news)

Eknath Khadse,  Pramod Mahajan
Loksabha Election 2024 : भाजपला खात्री, तर कॉँग्रेसला बदलाची आशा ; पंतप्रधान नरेंद्र मोदींसह प्रमुख नेत्यांच्या होणार सभा

नंदुरबारचा दौरा

खानदेशच्या दौऱ्यात महाजनांनी त्यावेळी पहिल्यांदा नंदुरबार जिल्ह्याचा दौरा केला. या अनु. जमातीसाठी राखीव आदिवासीबहुल मतदारसंघात सलग नऊ वेळा खासदार राहण्याचा विक्रम करणाऱ्या कॉंग्रेसच्या माणिकराव गावीत यांच्याविरुद्ध भाजपकडून डॉ. सुहास नटावदकर रिंगणात होते. नंदुरबार हा स्वातंत्र्यप्राप्तीपासून कॉंग्रेसचा गड.

‘एकोच चाले, पंजाच चाले’ अशी मतदारांची धारणा. कॉंग्रेसच्या नावाने ‘दगड’ उभा केला तरी निवडून येणार.. अशी नंदुरबारची स्थिती. अशा नंदुरबारमध्ये डॉ. नटावदकरांसाठी बऱ्यापैकी अनुकूल वातावरण तयार झाले होते. महाजनांची मोठी सभा या मतदारसंघात झाली.. त्यावेळी भाजपत असलेले एकनाथ खडसे सोबत होते. सभेनंतर नेतेमंडळी धुळे व पुढे जळगावी आली. नंदुरबारपासूनच महाजन- खडसेंमध्ये नंदुरबारच्या जागेच्या निकालावर दावे प्रतिदावे सुरु झाले होते.

नेत्यांमध्ये पैज लागली

नंदुरबारच्या जागेच्या निकालावरील चर्चा जळगावपर्यंत कायम होती. अजिंठा विश्रामगृहावर एके रात्री महाजन- खडसेंमध्ये यासंदर्भात झालेल्या चर्चेत ‘भाजपसाठी अनुकुल वातावरण आहे. डॉ. नटावदकर निवडून येतीलच, अशी स्थिती आहे..’ असा खडसेंचा दावा होता. महाजनांना मात्र त्यांचा दावा मान्य नव्हता. त्यावेळी अटलजींच्या नेतृत्वाखालील ‘रालोआ’ सरकारची कामगिरी चांगली होती, सरकारही सत्तेत येण्याचा विश्‍वास महाजनांना होता.

Eknath Khadse,  Pramod Mahajan
Jalgaon Loksabha: स्मिता वाघांच्या विरोधात ठाकरेंनी मैदानात उतरवलेल्या करण पवारांची ताकद किती?

मात्र, नंदुरबारच्या निकालाबाबत ते सकारात्मक नव्हते. खडसेंच्या मताच्या विरुद्ध त्यांचे मत होते. नंदुरबारला या वेळीही आपला खासदार होणार नाही, असा महाजनांचा ठाम दावा. त्या दावा- प्रतिदाव्यातून दोघांमध्ये पैज लागली. महाजन म्हणाले, ‘नाथाभाऊ नंदुरबारमध्ये जेव्हा भाजपचा खासदार निवडून येईल, त्यावेळी केंद्रात आपले पूर्ण बहुमताचे सरकार असेल..’ त्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी देशभरात राजकीय वातावरण ढवळून निघेल, भाजपची मोठी लाट असेल.. तेव्हाच नंदुरबारचा निकाल आपल्या बाजूने असेल, असे वक्तव्यही केले.

दशकानंतर स्वप्नपूर्ती

प्रमोद महाजनांसारख्या दूरदृष्टी असलेल्या नेत्याने २००४ मध्ये जे हेरले होते, ते २०१४ ला म्हणजेच दशकानंतर अनुभवाला मिळाले. २०१४ मध्ये नरेंद्र मोदींच्या लाटेत अख्ख्या देशात कमळ फुलले.. आणि केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार सत्तेत आले. अर्थात, नंदुरबारच्या जागेवर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रथमच भाजपचा उमेदवार डॉ. हिना गावीत यांच्या रुपाने विजयी झाला. २०१९ला त्याची पुनरावृत्ती झाली.. भाजपसाठीची ही स्वर्णिम स्वप्नपूर्ती अनुभवायला प्रमोद महाजन हयात नाहीत, हे पक्षाचे आणि महाजनांच्या लाखो चाहत्यांचे दुर्दैवच.

Eknath Khadse,  Pramod Mahajan
Satara Lok Sabha : सातारा, माढ्यासाठी पाडव्याचा मुहूर्त? शरद पवारांकडून घोषणेची शक्यता; भाजपमध्ये सस्पेन्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com