अबब ; आठशे रुपयात..लाचखोर पोलिस व त्याचा पंटर "चक्की पिसींग' 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

चाळीसगावातून प्रवासी वाहतूक करू देण्यासाठी  चालक स्वप्नील कृष्णा अहिरे यांच्याजवळ चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या आबासाहेब पाटील आला व त्यांनी चाळीसगावातून प्रवासी वाहतूक करायची असेल तर मागील व चालू महिन्यातील असे आठशे रुपये द्यावे लागतील असे म्हणत लाचेची मागणी केली. पैसे दिले नाही तर तुला वाहतूक करू देणार नाही आणि वाहनावर कारवाई करेल असा दम भरला होता.

जळगाव :- चाळीसगावातून प्रवासी वाहतूक करू देण्यासाठी आठशे रुपयांच्या लाचेची मागणी करून ती "पंटर' माध्यमातून स्वीकारल्याच्या प्रकरणात सोमवारी न्यायाधीश पी.वाय.लाडेकर यांच्या न्यायालयात दोषारोप सिद्ध होऊन शिक्षा ठोठावण्यात आली आहे. लाचेची मागणी करणारा आरोपी वाहतूक पोलिस आबासाहेब भास्कर पाटील (वय-44) यास 4 वर्षे तर लाच स्वीकारणारा त्याचा पंटर मोहन भिका गुजर (वय-54, रा.ओझर, ता. चाळीसगाव) याला 3 वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. 

चाळीसगावातील कॅप्टन कॉर्नर येथून वाहनात प्रवासी भरत असताना चालक स्वप्नील कृष्णा अहिरे यांच्याजवळ चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या आबासाहेब पाटील आला व त्यांनी चाळीसगावातून प्रवासी वाहतूक करायची असेल तर मागील व चालू महिन्यातील असे आठशे रुपये द्यावे लागतील असे म्हणत लाचेची मागणी केली. पैसे दिले नाही तर तुला वाहतूक करू देणार नाही आणि वाहनावर कारवाई करेल असा दम भरला होता. त्यानंतर वाहनचालकाने 31 मार्च 2016 रोजी जळगाव लाच लुचपत विभागाकडे वाहतूक पोलिसाची तक्रार केली लाच लुचपत विभागाच्या पथकाने लाच मागितल्याची खात्री केली होती. लाच घेण्यासाठी आलेल्या मोहन गुजर या पंटरला दुसऱ्या दिवशी (1 एप्रिल 2016 ) साईदत्त हॉटेल येथे लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले होते . या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता 

चार साक्षीदारांची साक्ष 
न्या.पी.वाय.लाडेकर यांच्या न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आल्या आल्यानंतर सरकारपक्षातर्फे ऍड भारती खडसे यांनी चार महत्त्वपूर्ण साक्षीदारांची साक्ष नोंदवून घेतली. त्यात तक्रारदार स्वप्नील अहिरे, पचं भाऊसाहेब बागूल, तत्कालीन पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, पोलिस निरीक्षक जगदीश पवार आदींच्या अचूक आणि महत्त्वपूर्ण साक्ष शिक्षेसाठी पुरेशा ठरल्या. 

असे कलम, अशी शिक्षा  
आरोपी पोलिस कर्मचारी आबासाहेब पाटील व लाच घेण्यासाठी नियुक्त पंटर मोहन गुजर यांच्या विरुद्ध पुराव्यांवरून दोषारोप सिद्ध होऊन आबासाहेब पाटील याला कलम -13 (1)(ड) सह 13 (2) प्रमाणे चार वर्ष सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, तर कलम -12 नुसार तीन वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, त्याचबरोबर आरोपी मोहन गुजर यास कलम-7 नुसार तीन वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने साधी कैदेची शिक्षा ठोठावली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news ; Punter hard labor with corrupt police of Chalisgaon