रक्षाबंधन आटोपून निघालेला भाऊ अपघातात ठार 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 4 August 2020

रक्षाबंधन आटोपल्यावर अजय दुचाकीने रत्नाप्रिंपी जाण्यासाठी निघाला. विद्यापीठासमोर अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात अजय जागीच ठार झाला.

जळगाव, : शहरात काकाकडे रक्षाबंधन आटोपून पुन्हा आपल्या गावी परतणाऱ्या तरुणाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात तो जागीच ठार झाला. अजय युवराज मनोरे (वय ४०, रा. रत्नापिंप्री, ता. पारोळा) असे मृताचे नाव आहे. ही घटना कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासमोर महामार्गावर मंगळवारी (ता. ३) दुपारी तीनच्या सुमारास घडली. 

रक्षाबंधनासाठी अजय मनोरे दुचाकीवरून दोन दिवसांपूर्वी जळगाव शहरातील अयोध्यानगरात काकांच्या घरी आला होता. मंगळवारी दुपारी रक्षाबंधन आटोपल्यावर अजय दुचाकीने रत्नाप्रिंपी जाण्यासाठी निघाला. विद्यापीठासमोर अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात अजय जागीच ठार झाला. वाहनधारकांनी तत्काळ रुग्णवाहिकेतून अजयचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात नेला व अजयच्या मोठ्या भावाला घटनेची माहिती दिली. माहिती मिळाल्यावर अजयचा मोठा भाऊ सचिन याने जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे हवालदार शिवदास चौधरी व राजेंद्र ठाकरे यांनी पंचनामा केला. विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पाळधी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

 

संपादन - रईस शेख


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news; Rakshabandhan's brother killed in an accident