जळगाव : यांत्रिकी शेतीतही ‘सालदारकी’ कायम

आखाजीला ठरले किमान ७० हजारांचे ‘साल’; मजुरांचा आता रोजंदारीवर भर
Jalgaon mechanical agriculture farmer worker progress
Jalgaon mechanical agriculture farmer worker progresssakal

जळगाव : अक्षयतृतीया खानदेशातील आखाजी शेतीपासून गोठ्यापर्यंतची सर्व कामे करणारा सालदार नेमायचा हा दिवस आधुनिक शेतीत मजुरांची जागा यंत्रांनी घेतली आणि मजुरांचाही भर आता रोजंदारीवर असला तरी ‘सालदार’कीची गरज आणि आखाजीची परंपरा आजही कायम आहे. आखाजीच्या मुहूर्तावर सालदाराचा वर्षभराचा किमान मेहनताना सत्तर हजार रुपये ठरला आहे. याव्यतिरिक्त त्याला सणानिमित्त दिली जाणारी उचल आणि धान्याची मदत ही वेगळीच असते.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त मानल्या जाणाऱ्या अक्षयतृतीयेला खानदेशात आखाजी म्हणून वेगळी ओळख आहे. ग्रामीण अन्‌ विशेषत: कृषिक्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारा आपला प्रदेश. त्यामुळे अशा सण-उत्सवांचा शेतीशी कुठल्या न कुठल्या माध्यमातून संबंध असतोच.

यांत्रिकी शेती वाढली

गेल्या काही वर्षांत यांत्रिकी शेती वाढली आणि सालदार नेमायचे प्रमाण काळानुरूप कमी होऊ लागले. नांगरणी, वखरणी, कोळपणी आदी कामांसाठी यंत्रे आली. पाणी काढण्यापासून शेतीला देण्यापर्यंत यंत्रांचा उपयोग होऊ लागला आणि त्यामुळे सालदार बाद होऊ लागले.

तरीही प्रथा कायम

असे असले तरी जळगाव जिल्ह्यात काही भागात अजूनही बऱ्याच मोठ्या शेतकऱ्यांकडे सालदार कायम आहेत. आखाजीला या सालदारांचे ‘साल’ ठरवले जाते. गाव, तालुका व भागानुसार वेगवेगळा दर आकारला जातो. वर्षानुवर्षे एकाच शेतकऱ्याकडे काम करणारे गडी आजही आहेत. खानदेशात प्रामुख्याने सातपुडा भागातून भिल, आदिवासी लोक सालदार म्हणून नेमले जातात.

रोजंदारीवर भर

गेल्या काही वर्षांत शेतीकामासाठी मजूर मिळणे कठीण झाले. मजुरीही वाढली. सध्या शेतात राबणाऱ्या महिला मजुरांना १५० ते २०० रुपये रोज, तर पुरुषांना २५० ते ३०० रुपये रोज दिला जातो. सालदारकीऐवजी आता रोजंदारीवरच काम करून घेतले जात असल्याचे चित्र आहे. काही गावांमध्ये महिन्याला सहा ते सात हजार रुपयांनी मजूर ठरवले जातात.

असे ठरते ‘साल’

‘साल’ ठरविण्याची पद्धत अगदी साधी आहे. ती ‘जबानी’ म्हणजेच तोंडी ठरवली जाते. वर्षभरासाठी सालदाराला ठराविक रक्कम कबूल केली जाते. सध्या सर्वसाधारणपणे ७० हजार ते ९० हजारांपर्यंतचा दर आहे. सोबत ठराविक पोती धान्यही दिले जाते. पोळा, दिवाळीला सालदाराला कपडे देण्याची पद्धत आहे. काही ठिकाणी आता सालदार धान्य घेत नाही, त्यांना रोख रक्कमच द्यावी लागते.

‘सालदारकी’ची प्रथा

आखाजीच्या याच दिवशी शेतीत काम करणारा गडी नेमायची परंपरा आहे. अनेक वर्षांपासून सधन (जास्त जमीन असलेले) शेतकरी वर्षभर करावयाच्या कामांसाठी म्हणून सालदार नेमतात. माती, पाण्यापासून गोठ्यापर्यंतची सर्व कामे हा गडी करतो. प्रसंगी घरातील कामांनाही हातभार लावतो अन्‌ त्यामुळे तो शेतकऱ्याच्या घरचा सदस्यच होऊन जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com