जळगाव : रस्ते कामाच्या दर्जावरून मक्तेदार, अभियंता रडारवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Road construction

जळगाव : रस्ते कामाच्या दर्जावरून मक्तेदार, अभियंता रडारवर

जळगाव : रस्त्याच्या कामाचे कॉंक्रिटीकरण सुरू असताना अचानक पाहणी करायला गेलेल्या आयुक्तांनी मक्तेदार व मनपा अभियंत्यास कामाच्या दर्जावरून चांगलेच झापले. कामासंबंधी तांत्रिक बाबींची माहितीही न देऊ शकलेल्या यंत्रणेची आयुक्तांनी तासभर झाडाझडती घेतली. तसेच कामाच्या गुणवत्तेत कसूर नको, असा सज्जड दमही भरला.

जळगाव शहरातील काही मोजक्या भागात रस्ते, गटारांची कामे सुरू आहेत. काही ठरावीक नगरसेवक आपापल्या परीने, सातत्याने पाठपुरावा करून आपल्या भागासाठी निधी मंजूर करून घेत ही कामे करीत आहेत. अशाच स्वरूपाचे रस्ता कॉंक्रिटकरण, डांबरीकरणाचे २४ लाख ७ हजार रुपयांची कामे वॉर्ड क्र. १२मध्ये स्टेट बँक कॉलनी व परिसरात होत आहेत.

आयुक्तांनी केली पाहणी

नगरसेवक नितीन बरडे यांच्या पाठपुराव्यामुळे ही कामे मंजूर झाली असून ती सध्या सुरू आहेत. मात्र, कामाचा दर्जा व गुणवत्ता राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह मनपा आयुक्तांनी या कामांची पाहणी करावी, असे निवेदन बरडेंनी दिले होते. ही मागणी मान्य करत वॉर्ड क्र. १२मधील स्टेट बँक कॉलनीतील कामाची पाहणी करण्यासाठी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी मंगळवारी (ता. १४) प्रत्यक्ष काम सुरू असलेल्या साईटवर गेले. सोबत नगरसेवक नितीन बरडे होते.

तंत्रज्ञनच हजर नाही

काम सुरू असलेल्या ठिकाणी आयुक्तांनी भेट दिली असता कुणीही तंत्रज्ञ नव्हता. ठेकेदार कोण, कॉंक्रिटीकरण करताना सिमेंट, वाळू, खडीचे प्रमाण किती घेतले जात आहे, रस्त्याची उंची, रुंदी किती अशा तांत्रिक मुद्यांवरुन प्रश्‍न विचारले. परंतु, त्यांच्या एकाही प्रश्‍नाचे उत्तर ते देऊ शकले नाही. मनपा अभियंता वडनेरे, जावळे हेदेखील होते, मात्र त्यांनाही योग्य ते उत्तर देता आले नाही.

मक्तेदाराची झाडाझडती

त्यावर संतप्त होऊन आयुक्त कुळकर्णी यांनी ठेकेदार कोण, त्याला बोलवा अशा सूचना केल्या. काही वेळाने नारखेडे म्हणून ठेकेदार हजर झाले. त्यांनाही या कामाच्या दर्जा, गुणवत्ता व कामासाठी वापरले जाणाऱ्या घटकांचे प्रमाण याबाबत विचारले असता त्यांनाही माहिती देता आली नाही. त्यामुळे आयुक्त संतप्त झाले व त्यांनी मक्तेदाराची झाडाझडती घेतली. २४ लाखांहून अधिक रकमेचे काम असताना याठिकाणी एकही तंत्रज्ञ नाही, याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा: Corona Update : राज्यात नवे 886 रुग्ण; मृत्युसंख्येत किंचित वाढ

मुख्य रस्त्यांची सूचना

वॉर्डामधील अंतर्गत रस्त्यांची कामे करत असताना मुख्य व प्रमुख रस्त्यांच्या कामांनाही प्राधान्य द्यावे, अशी सूचना आयुक्तांनी केली. नगरसेवक नितीन बरडे यांना त्यांनी काव्यरत्नावली ते महाबळ रस्त्याचे काम प्राधान्याने हाती घ्यावे, असे सांगितले.

"प्रभागातील रस्ते व गटारांच्या कामाची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांसह आयुक्तांनी करावी, असे निवेदन आपण दिले होते. त्यानुसार मंगळवारी आयुक्तांनी पाहणी केली. दोन दिवसांनंतर जिल्हाधिकारीही कामांची पाहणी करणार आहेत."

- नितीन बरडे, नगरसेवक

"रस्त्यांच्या कामाचा दर्जा, गुणवत्ता चांगली राखलीच पाहिजे. काम निविदा रकमेच्या कमी रकमेने घेतले असेल तरीही कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड केली जाऊ नये, अशा सूचना सर्वच अभियंत्यांना दिल्या आहेत."

- सतीश कुळकर्णी, आयुक्त.

loading image
go to top