मलनिस्सारण, भुयारी गटारांचे काम वेगात; दररोज ४२ दशलक्ष लिटर पाणीनिर्मिती 

सचिन जोशी
Wednesday, 23 December 2020

पाणीपुरवठा योजनेचे काम तीन वर्षांपूर्वी सुरू होऊन अद्यापही या योजनेचे काम पूर्ण झालेले नाही. तुलनेत भुयारी गटारांचे काम वेगात सुरू आहे. 

जळगाव : ‘अमृत’ योजनेंतर्गत सुरू असलेला भुयारी गटार व मलनिस्सारण प्रकल्प जुलै २०२१ पूर्ण होऊन कार्यान्वित होईल. त्यातून सांडपाण्यावर प्रक्रिया होऊन पुनर्वापरासाठी तब्बल ४२ ‘एमएलडी’ म्हणजेच ४२ दशलक्ष लिटर पाणी दररोज उपलब्ध होणार आहे. हे पाणी कृषी व उद्योगासाठी वापरता येणार असून, महापालिकेला त्यातून उत्पन्नही मिळू शकेल.

 

जळगाव शहरात ‘अमृत’ योजनेच्या पहिल्या टप्प्यात पाणीपुरवठा व भुयारी गटारांसह मलनिस्सारणाचे काम हाती घेण्यात आले आहे. पाणीपुरवठा योजनेचे काम तीन वर्षांपूर्वी सुरू होऊन अद्यापही या योजनेचे काम पूर्ण झालेले नाही. तुलनेत भुयारी गटारांचे काम वेगात सुरू आहे. 

एल.सी. इन्फ्राकडे काम 
‘अमृत’अंतर्गत भुयारी गटारांच्या १६९ कोटींचे कंत्राट अहमदाबाद येथील एल.सी. इन्फ्रास्ट्रक्चर या एजन्सीला देण्यात आले आहे. तत्पूर्वी २०१७ च्या सर्वेक्षणानुसार कामाचा आराखडा तयार करून निविदा मंजूर करण्यात आली. प्रत्यक्ष कामाला ऑगस्ट २०१८ मध्ये सुरवात झाली. काम पूर्ण करण्याची मुदत ३१ जुलै २०२१ पर्यंत आहे. २४ महिन्यांत काम पूर्ण करून पुढील सहा महिने योजना यशस्वीपणे कार्यान्वित होते की नाही, यासाठी मक्तेदार एजन्सीलाच देखभाल-दुरुस्ती करायची आहे. 

 

प्रकल्पाचे काम गतिमान 
मलनिस्सारणाचा प्रकल्प शिवाजीनगर भागात तयार होत आहे. त्यासाठी २० वेगवेगळे स्ट्रक्चर उभे राहत असून, त्याचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. फाउंडेशनचे काम पूर्ण असून, आता सिव्हिल वर्क सुरू आहे. सोबतच तांत्रिक बाबींची पूर्तताही केली जात आहे. या प्रकल्पाच्या उभारणीसाठी लागणाऱ्या विजेचा पुरवठा महापालिकेला करावा लागणार असून, त्याची प्रतीक्षा आहे. 

 

अशी आहे क्षमता 
शहरातील सर्व सांडपाणी या प्रकल्पापर्यंत भुयारी गटारांच्या माध्यमातून आणून त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. या प्रक्रियेनंतर त्यातून दररोज ४२ दशलक्ष लिटर पाणी तयार होऊन ते कृषी अथवा अन्य वापरासाठी उपयोगात आणता येईल. जुलै २०२१ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुढील सहा महिने म्हणजे फेब्रुवारी २०२२ पर्यंत प्रकल्प मक्तेदार एजन्सीच्या ताब्यात राहील व नंतर महापालिकेकडे त्याचे हस्तांतर होईल. ४७ कोटींच्या खर्चाचा हा प्रकल्प आहे. 

२०४ किलोमीटर भुयारी गटार 
भुयारी गटारांचे कामही प्रगतिपथावर असून, ते आतापर्यंत ४५ टक्के झाले आहे. शहरातील प्रमुख भागात भुयारी गटार होणार असून, सुरवातीला २०१७ च्या सर्वेक्षणानुसार १४१ किलोमीटर लांबीच्या वाहिन्या त्यासाठी टाकल्या जाणार होत्या. मात्र, त्यात काही भाग सुटत असल्याने नंतर तो वाढून आता २०४ किलोमीटर अंतर्गत वाहिन्या टाकण्यात येतील. 

 

प्रकल्प दृष्टिक्षेपात 
योजना : ‘अमृत’अंतर्गत भुयारी गटार व मलनिस्सारण 
योजनेवरील खर्च : १६९ कोटी (एकूण) 

सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प : ४५ कोटी 
भुयारी गटार लांबी : २०४ किलोमीटर 
आतापर्यंतचे काम : ४५ ते ५० टक्के 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon municipal corporation marathi news jalgaon drainage speeding work underground sewers Water production