Jalgaon: साखर झोपतच कोसळली दोनमजली इमारत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इमारत कोसळली
साखर झोपतच कोसळली दोनमजली इमारत

जळगाव : साखर झोपतच कोसळली दोनमजली इमारत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील शनीपेठ परिसरात असलेल्या मनपा गंगुबाई शाळेसमोर असलेली एक जुनी इमारत गुरुवारी (ता. ११) पहाटेच्या सुमारास कोसळली. सुदैवाने वेळीच बाहेर पडल्याने ७ लोक बचावले आहेत. इमारतीच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या एका वृद्धेला नातवासह सुखरुप बाहेर काढून जीव वाचवण्यात यश आले आहे.

जळगावातील शनीपेठेत असलेल्या कै. गंगुबाई यादव शाळेसमोर एका इमारतीच्या बांधकामात तळ मजल्यासाठी खोल खड्डा खोदण्यात आला आहे. बांधकामाधीन इमारतीच्या शेजारी घरे लोडबेरिंग पद्धतीचे असल्याने त्यांना देखील धोका निर्माण झाला होता. या बांधकामास लागून असलेली दुमजली इमारत गुरुवारी सकाळी ५ वाजेच्या सुमारास अचानक कोसळली. इमारतीमध्ये ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका ७५ वर्षीय वृद्धेला सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

हेही वाचा: एक कॅच सुटला अन् पाकिस्तानचं झालं T20 वर्ल्ड कपमधून 'पॅक-अप'

नातवाची सतर्कता अन्‌ प्राण वाचले पहाटे ४ वाजेच्या सुमारास पाटील कुटुंबीयांसह परिसर गाढ साखरझोपेत असताना इमारतीची माती अंगावर पडायला सुरवात झाल्याने नातू रोहित पाटील याला जाग आली. भिंतीची माती अंगावर पडत असल्याने त्याने इतरांना जागी केले. क्षणाचाही विलंब न करता रमेश पाटील, शोभा पाटील यांच्यासह दिवाळीनिमित्त माहेरी आलेल्या बहिणी सोनाली पाटील, गायत्री पाटील व एक ५ वर्षीय चिमुकली अशांनी बाहेरचा रस्ता धरला. घरातील सर्व जिन्यावर येताच इमारत कोसळली.

आजी ढिगाऱ्याखालून सुखरूप कोसळलेल्या इमारतीच्या खालच्या खोलीत कलाबाई पाटील (वय- ७५) या राहत होत्या. इतरांना वाचवत असताना आजीला बाहेर काढण्याच्या आतच इमारत कोसळली. ढिगाऱ्याखाली दबून कलाबाई यांच्या हाडाला व छातीला मार लागल्याने त्या हालचाल करू शकल्या नाही. मात्र, परिसरातील तरुण कृणाल महाजन, रज्जाक सैय्यद, रोहित पाटील, इम्रान खान, वाहिद खान, वसीम खान, शाहिद खान अशांसह मनपा अग्निशमन दलाचे शशिकांत बारी, कर्मचारी संतोष तायडे, रोहिदास चौधरी, भगवान पाटील, प्रदीप धनगर, सरदार पाटील, जगदीश साळुंखे, रवींद्र बोरसे, सोपान जाधव, पन्नालाल सोनवणे, नासिर शौकत अली, नितीन बारी आदींनी झोकून देत रहिवाशांचे प्राण वाचवले.

हेही वाचा: T20 WC : पाकिस्तानचा खेळ खल्लास! नवा गडी नवं राज्य!

महापालिकेला येईना शुद्ध जळगाव शहरात अडीचशेवर इमारती धोकादायक स्थितीत आहेत. तर काही वास्तव्यास योग नाहीत. बहुतेक ठिकाणांवर बांधकाम करताना शेजारील घरांची योग्य ती काळजी. घेतली जात नाही. नवीन बांधकामासाठी पाया खोदतांना, पार्किंगसाठी किंवा तळघर खोदताना शेजारच्या इमारतींची काळजी आणि नुकसान होऊन जीवितहानी होणार नाही याची जबाबदारी महापालिकेच्या नगररचना विभागाच्या तज्ज्ञ अभियंत्यांनी घेणे अपेक्षित आहे अन्यथा मोठी दुर्घटना घडल्यावर पश्चात्तापाची वेळ नक्कीच येईल.

loading image
go to top