जळगाव : ‘पोलिसदादा’ने मिळवून दिला सौभाग्याचा दागिना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जळगाव : ‘पोलिसदादा’ने मिळवून दिला सौभाग्याचा दागिना

जळगाव : ‘पोलिसदादा’ने मिळवून दिला सौभाग्याचा दागिना

जळगाव : मंगळसूत्र चोरीच्या आठ गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी चोरट्यांकडून १३९ ग्रॅम वजनाचे आठ मंगळसूत्र जप्त केले होते. पैकी ९२ ग्रॅम वजनाचे पाच मंगळसूत्र पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या हस्ते संबंधित महिलांना परत करण्यात आले. चोरीला गेलेला सौभाग्याचा दागिना अनपेक्षितपणे पोलिसांकडून परत मिळाल्यावर महिलांना आनंदाश्रू अनावर झाले.

जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात आयोजित या कार्यक्रमास अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी कुमार चिंथा, जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामदास वाकोडे यांच्यासह गुन्ह्यांचा छडा लावणारे गुन्हेशोध पथकातील कर्मचारी उपस्थित होते. पोलिस अधीक्षकांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चार, रामानंदनगर पोलिस ठाणे हद्दीतील तीन, औरंगाबाद येथील एक अशा एकूण आठ गुन्ह्यांमध्ये मंगळसूत्र चोरीला गेले होते. गुन्ह्याचा छडा लावून पोलिसांनी दोन चोरट्यांकडून १३९ ग्रॅम वजनाचे आठ मंगळसूत्र हस्तगत केले. पोलिस अधीक्षक डॉ. मुंढे यांच्या हस्ते प्रेमनगर येथील प्रतिभा काटदरे यांना २० ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, चैतन्यनगरातील प्रतिभा सोमाणी यांचे चोरीला गेलेले २० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, श्रीनिवास कॉलनीतील सुनीता पाटील यांना १० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, गुरुकुल कॉलनीतील सुनीता कुलकर्णी यांचे ३० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र परत करण्यात आले.

पोलिसांचे आभार

जिल्हापेठ ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक महेंद्र वाघमारे, सलीम तडवी, विकास पहूरकर, योगेश साबळे, समाधान पाटील यांच्या पथकाने चिवट तपास करत अट्टल गुन्हेगार सतीश चौधरी (रा. मालेगाव) व संदीप सोनवणे (रा. नाशिक) या दोघांना अटक केली होती. उपस्थित महिलांनी पोलिसांचे आभारही व्यक्त केले.

महिलांनी चोरटे ओळखले

एकांत रस्त्यावर, घराबाहेर, पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दोघा अट्टल गुन्हेगारांनी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून पोबारा केला होता. चोरीला गेलेला ऐवज परत मिळेल याची अपेक्षाही या गृहिणींना नव्हती. मात्र, गुन्ह्याचा तपास होऊन दोन संशयितांना अटक झाली त्यांनी गुन्हे कबूल केले. संबंधित महिलांनी या चोरट्यांना ओळखपरेडमध्ये ओळखले. पोलिसांनी शंभर टक्के रिकव्हरीचा टास्क पूर्ण करत चोरीतील मंगळसूत्र जप्त केले.

टॅग्स :Jalgaon