जळगाव : पालक गमावलेल्या बालकांची नोंदणी करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालक गमावलेल्या बालकांची नोंदणी करा

जळगाव : पालक गमावलेल्या बालकांची नोंदणी करा

जळगाव (पाचोरा) : कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत ज्या बालकांचे पालक मृत होऊन बालक निराधार झाले आहेत, अशांची नोंदणी त्वरित करून शासनाच्या लाभार्थी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले. आमदार पाटील यांनी शिवालय या आपल्या संपर्क कार्यालयात गुरुवारी (ता. १८) सायंकाळी पत्रकार परिषद घेतली. या वेळी ॲड. अभय पाटील, ॲड. दिनकर देवरे, दीपकसिंग राजपूत, उद्धव मराठे, किशोर बारावकर, अरुण पाटील हे पदाधिकारी उपस्थित होते.

या वेळी आमदार पाटील यांनी स्पष्ट केले, की कोरोना आजारामुळे पालकत्व गमावलेले बालक निराधार झाले आहेत. या बालकांना धीर व आधार देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने विविधांगी लाभार्थी योजना जाहीर केल्या असल्या तरी केंद्राने जाहीर केलेली योजना ही दिशाभूल करणारी आहे. केंद्राने निराधार बालकांना ५० हजार रुपये निधी जाहीर केला असला तरी त्या संदर्भातील अध्यादेशामध्ये ज्या त्या राज्याने आपत्ती व्यवस्थापनातून हा निधी द्यावा, असा उल्लेख आहे. त्या बाबतच्या तक्रारी व मागणी वाढत असून, केंद्रीय यंत्रणांनी याबाबतचा स्पष्ट निर्णय घेऊन जाहीर करावा व दिशाभूल थांबवावी, असे स्पष्ट करून निराधार बालकांसाठी राज्य सरकारच्या योजनांबाबत माहिती दिली.

हेही वाचा: "मी पुन्हा येतेय, काहीतरी तुफानी करुयात"; अमृता फडणवीसांचं सूचक ट्विट

अधिकाऱ्यांची बैठक

राज्य सरकारच्या अध्यादेशानुसार कार्यवाहीसाठी विलंब होत असल्याने आमदार किशोर पाटील यांनी प्रांताधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या कार्याचा आढावा घेतला. त्यात पाचोरा तालुक्यात ७३ व भडगाव तालुक्यात ६९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले असून, ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. ज्यांचे आई- वडील गेले असे पाचोरा तालुक्यात पाच व भडगाव तालुक्यात तीन असे एकूण आठ बालक असून, त्यांची नावे प्रत्येकी पाच लाख रुपये बचत खात्यात जमा करण्यात आली आहेत. तसेच पाचोरा तालुक्यात ५० व भडगाव तालुक्यात ४५ भगिनींना वैधव्य आल्याचे सांगून १८ वर्षे वयापर्यंतच्या बालकांना दरमहा १ हजार १०० रुपये तर विधवा भगिनींना १ हजार रुपये रक्कम देण्याची कार्यवाही राज्य शासनाच्या आदेशानुसार सुरू आहे. कोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या व निराधार झालेल्या काही बालकांची नोंदणी अजूनही बाकी असल्याचे सांगून ज्या बालकांचे दोघे पालक अथवा आई किंवा वडील कोरोनामुळे मृत झाले असतील अशा पाचोरा व भडगाव तालुक्यातील कुटुंबीयांनी तहसील कार्यालय अथवा महिला बाल कल्याण कार्यालयाशी संपर्क साधून, विहित नमुन्यातील अर्ज भरून, राज्य शासनाच्या लाभार्थी योजनेचा लाभ घ्यावा. त्यासंदर्भात तत्काळ कार्यवाही करण्यात येईल. काही अडचणी आल्यास शिवतीर्थ या शिवसेना कार्यालयाशी संबंधितांनी संपर्क साधावा, त्यांना योग्य ते व सहकार्य व मार्गदर्शन केले जाईल, असे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले. किशोर बारावकर यांनी आभार मानले.

loading image
go to top