जळगाव : खासगी ट्रॅव्हल्सचा महामार्गावर अनधिकृत ठिय्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Unauthorized stops of private bus on highway

जळगाव : खासगी ट्रॅव्हल्सचा महामार्गावर अनधिकृत ठिय्या

जळगाव : ट्रक, स्टॉल्स, फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाने वेढलेल्या शहरातील चौपदरी महामार्गावर आता खासगी ट्रॅव्हल्स बसचे अनधिकृत स्थानकच तयार झाले आहे. जिल्हा उद्योग केंद्रासमोर महामार्गाच्या दुतर्फा रात्री मोठमोठ्या बस लागलेल्या असतात. तेथूनच प्रवासी बसमध्ये बसत असून, त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे.

शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील अपघातांचे वाढलेले प्रमाण बघता महामार्गाचे चौपदरीकरण व समांतर रस्त्यांची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. तीन वर्षांपूर्वी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू होऊन ते नुकतेच पूर्णत्वास आले. त्यामुळे वाहनांची वर्दळ कमी होऊन वाहतुकीचे सुरळीत नियमन होईल, अपघातांचा धोका टळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, झाले उलटेच. महामार्गाच्या चौपदरी बाजूंवर अनधिकृत थांबे, अतिक्रमणाने गर्दी केली आणि हा महामार्ग आणखीच धोकादायक बनला आहे.

आता खासगी बसचा ठिय्या

शहरातील महामार्गावर कालिकामाता ते अजिंठा चौक व पुढे इच्छादेवी चौकापर्यंत दोन्ही बाजूला ट्रक, कारबाजाराचे मोठे अतिक्रमण झाले आहे. पुढे प्रभात चौक ते थेट विद्युत कॉलनीपर्यंत दुतर्फा स्टॉल्स, फेरीवाले, बांधकाम साहित्याचे ठेले असल्याने वाहतुकीची कोंडी होतेय. आता त्यात खासगी ट्रॅव्हल्सच्या बसने ठिय्या मांडला आहे.

गर्दीमुळे कोंडी

महामार्गावर जिल्हा उद्योग केंद्रासमोर आयएमआर महाविद्यालयाच्या जोडरस्त्यालगत महामार्गावर दोन्ही बाजूंनी खासगी ट्रॅव्हल्स बस उभ्या असतात. पुणे, मुंबईकडे जाणाऱ्या या बसची मोठी गर्दी या ठिकाणी होते. या व्हॉल्व्हो बसला जागाही मोठी लागते. शिवाय या थांब्यावरूनच प्रवासी बसमध्ये बसत असल्याने प्रवाशांना सोडायला आलेल्या नातलगांच्या वाहनांचीही या ठिकाणी मोठी गर्दी होऊन वाहतुकीची कोंडी होत आहे.

रात्रीची वेळ अन्‌ अंधार

विशेष म्हणजे रात्री आठ ते दहा दीड-दोन तासांत बसची चांगलीच वर्दळ या ठिकाणी असते. त्यातही महामार्गावर पथदीप नसल्याने अंधार असतो. महामार्गाच्या दुतर्फा वसलेल्या वसाहतींमधील वाहनधारकांची मोठी संख्या या वेळेत जा-ये करीत असते. त्यामुळे या खासगी बसमुळे अपघातांचा धोका वाढला आहे.

वाहतूक शाखेची झोप

एरवी कुठल्याही रस्त्यावरून नियमाने जाणाऱ्या वाहनधारकास मध्येच अडवून त्याची तपासणी करणाऱ्या वाहतूक पोलिस शाखेला महामार्गावरील अतिक्रमण, वाहतुकीची कोंडी, बसचा अनधिकृत थांबा या गंभीर आणि अपघातांना निमंत्रण देणाऱ्या गोष्टी दिसत नाहीत. वाहतूक शाखा झोपा झोडतेय का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. दुसरीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ही यंत्रणाही रस्त्याचे काम झाले, आता आमची जबाबदारी काय, या भूमिकेत असल्यासारखे दिसते.

Web Title: Jalgaon Unauthorized Stops Of Private Bus On Highway

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top