
जळगाव : भुयारी मार्गासाठी नागरिकांची पायपीट
पारोळा : अमळनेर रोड व वंजारी रस्त्यालगत बालाजी सिटी, गजानन सिटी, अशोकनगर भाग १ व २, दुर्गाईनगर, एकवीरानगर, गायत्रीनगर या वसाहतीधारकांना गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट व संघर्ष करावा लागत आहे. मात्र अद्यापदेखील त्याला यश आले नाही.
या कठीण परिस्थितीचा सामना करीत असताना ४६ महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून वंजारी रस्त्याजवळ भुयारी मार्ग व्हावा, यासाठी वसाहतीधारकांसह ग्रामस्थ गेल्या अनेक दिवसांपासून पायपीट करीत आहेत. पिण्याचे पाणी तर नाहीच आता भुयारी मार्गासाठी वसाहतीधारकांना संघर्ष करावा लागत आहे.
तत्काळ भुयारी मार्ग तयार व्हावा, यासाठी वसाहतधारकांनी खासदार उन्मेष पाटील, आमदार चिमणराव पाटील, आमदार सुरेश भोळे यांना निवेदन दिले. संबंधित सर्व लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनासुद्धा निवेदने देण्यात येणार आहे. वंजारी रस्त्यालगत वसाहतधारकांसह ८०० ते ९०० वंजारी गावाचे ग्रामस्थ, बालाजी शाळेतील ४५०० विद्यार्थी रिक्षाचालक, इतर दैनंदिन कामांसाठी नियमित ये-जा करीत असतात. या रस्त्यामुळे अनेकांचा वेळ वाचतो, रहदारीमुळे गर्दी होत नाही, बाजारपेठ जवळ पडते.
यासाठी वंजारी रस्त्याजवळ भुयारी मार्ग होणे गरजेचे असून याबाबत लोकप्रतिनिधी व महामार्गाचे संबंधित अधिकारी यांनी लक्ष देऊन भुयारी मार्गाचा जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी विद्यार्थी पालकवर्ग, गावकरी यांनी केली आहे. वंजारी रस्त्यालगत भुयारी मार्ग न झाल्यास येथील ग्रामस्थ, वसाहत धारक महिला व विद्यार्थ्यांना अमळनेर रस्त्यावरून ये-जा करावी लागणार आहे. त्यामुळे रहदारीचे प्रमाण वाढून येणाऱ्या काळात अपघातांचे प्रमाणदेखील वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Web Title: Jalgoan Citizen Struggle For Tunnel Statement To Mp And Mla
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..