Jalgaon News: रमजान महिन्यात लोडशेडींग करू नये; मुस्लिम बांधवांची मागणी
जळगाव : येत्या २३ मार्चपासून रमजान महिना सुरू होत आहे. हा मुस्लिमबांधवांचा पवित्र महिना असतो. पहाटेच उठून रोजाची तयार करावी लागते. यामुळे या महिन्यात लोडशेडींग करू नये, खास ईद बाजार भरविण्याची परवानगी द्यावी, शहरातील खड्डे भरावेत आदी मागण्या मुस्लिम शिष्ट मंडळाने जिल्हा प्रशासन, वीज कंपनी, पोलिस प्रशासन, महापालिकेकडे केली आहे.
जिल्ह्यात वीजपुरवठा सुरळीत ठेवावा, या कालावधीत लोडशेडिंग करू नये व मोहल्लामधील सर्व पथदीप बंद आहेत, ते त्वरित सुरू करावेत, संपूर्ण जिल्ह्यात ग्रामपंचायत, नगरपालिका व महापालिकेंतर्गत स्वच्छता मोहीम राबवून संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवावा.
खास करून गटारीची स्वच्छता करून ती घाण त्वरित उचलण्याची व्यवस्था करावी, जिल्ह्यात व शहरात खड्ड्यांचे प्रमाण जास्त असल्याने आवश्यक ठिकाणी उपाययोजना करावी, रात्री वृद्ध व लहान मुलांना नमाज व रोजा इफ्तारसाठी त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, ज्या ठिकाणी काम सुरू आहे, त्या वस्तीतील कामे त्वरित पूर्ण करावीत, रमजानसाठी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने त्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा व्यवस्था करावी.
काही ठिकाणी खास ईद बाजार भरविण्याची परवानगी द्यावी. रमजान पर्वमध्ये जकात जमा करण्यासाठी महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील राज्यातील सफिर लोक (जकात जमा करणारे) शहरात व जिल्ह्यात वर्गणी जमा करण्यासाठी येत असतात. त्यांच्या पोशाखावरून त्यांच्यावर हल्ले होतात.
अशा काही विशिष्ट ठिकाणी सुरक्षा प्रदान करावी. रमजान पर्व व रमजान ईद शांततेत साजरी होण्यासाठी सराईत गुन्हेगार व खास करून दोन समाजांत तेढ निर्माण करणाऱ्या घटकांवर त्वरित प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत.